७५५ विद्यार्थ्यांना मोफत बस पास

कोल्हापूर : शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील आर्थिक ओझे हलके करण्याबरोबरच त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीतील ७५५ विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास पासचे वितरण करण्यात आले.

महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीची अंमलबजावणी करत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोफत बस प्रवास पास देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करताना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दर महिन्याच्या ९ तारखेला राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या वतीने १५० विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित कार्यक्रमात उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वितरित करण्यात आल्या.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळणार आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दिपा ठाणेकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती शिला सोनुले, पाणीपुरवठा समिती सभापती संगीता सावंत, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, प्रभाग समिती सभापती अनुराधा खेडकर, गटनेते शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त उज्वला शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अधिकारी, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव, अजित ठाणेकर, संजय सावंत, आनंदराव खेडकर तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!