ईश्वरपूर : कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर झपाट्याने वाढत असून, ड्रोनद्वारे औषध फवारणीतून ग्रामीण भागातील युवकांना उद्योग-व्यवसायाची नवी संधी उपलब्ध होत आहे. युवकांनी या क्षेत्रातील संधी ओळखून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन वाळवा पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अमोल कोळी यांनी केले. उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे तसेच शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजारामनगर येथील गायत्री गेस्ट हाऊस येथे चातक किसान ड्रोन (चातक इनोव्हेशन) यांच्या वतीने शेतकरी व युवकांसाठी आयोजित मोफत मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात कृषी ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती, या क्षेत्रातील यशस्वी युवा उद्योजकांशी संवाद आणि प्रत्यक्ष ड्रोन हाताळणीचा अनुभव, असे तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी उपतालुका कृषी अधिकारी अमोल जंगम, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत मंडले, चातक इनोव्हेशनचे बाजीराव नांगरे-पाटील, संदीप वाघमोडे व शुभम पाटील उपस्थित होते. प्रारंभी देवी सरस्वती आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
अमोल कोळी म्हणाले, ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्याने औषधांचा वापर कमी होण्यासह वेळ आणि श्रमाची बचत होते. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ड्रोनसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात मक्याच्या पिकावर तीन हजार एकर क्षेत्रात ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यात आली आहे.
अमोल जंगम म्हणाले, ग्रामीण भागात ड्रोनद्वारे औषध फवारणी हा नवा व्यवसाय म्हणून विकसित होत आहे. चातक इनोव्हेशनकडून युवा उद्योजकांना प्रोत्साहन व पाठबळ दिले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी ४० टक्के, तर कृषी पदवीधर युवकांना ५० टक्के अनुदान दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
चातक इनोव्हेशनचे बाजीराव नांगरे-पाटील, संदीप वाघमोडे व शुभम पाटील यांनी कृषी ड्रोन तंत्रज्ञान, फवारणीची पद्धत, व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण व परवाने, कर्ज सुविधा आणि शासकीय अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसनही केले.
ऊस पीक तज्ज्ञ सुनील जरकर यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणीचे फायदे स्पष्ट केले. यशस्वी ड्रोन उद्योजक स्वरूप पुजारी, अमर लादे, स्वप्नील माने, निखिल नांगरे-पाटील, प्रमोद खट्टे व आकाश कदम यांनी या व्यवसायातील अनुभव कथन करताना मिळणाऱ्या संधी आणि फायदे विशद केले.
प्रत्यक्ष प्रशिक्षणामुळे युवक समाधानी
या शिबिरात केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रशिक्षणार्थींना ड्रोन हाताळणी, औषध फवारणीची प्रक्रिया आणि व्यवसायाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. त्यामुळे सहभागी युवक-युवतींनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी अवधूत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी माने, इंद्रजित पाटील यांच्यासह शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्वेतलाना मोहिते यांनी आभार मानले.









