टाकवे : वन्य प्राण्याच्या भीतीने सतत दबावाखाली राहण्यापेक्षा सतर्क राहून स्वसंरक्षण करुया. त्याचसाठी ‘शिवम् शौर्य’ अभियानाच्या माध्यमातून वन्य प्राण्यांपासून सुरक्षिततेची नवी दिशा देण्याचे काम मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान आणि शिराळा वन विभागामार्फत सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी केले.
टाकवे येथील टाकवे हायस्कूलमध्ये मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान व वन विभाग शिराळा यांच्या मार्फत ‘शिवम् शौर्य : सुरक्षा अभियान’ या वन्य प्राण्यापासून शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण कसे करावे, हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. गट शिक्षणाधिकारी पोपटराव मलगुंडे, वनपाल चंद्रकांत देशमुख प्रमुख, कोल्हापूर वन्य जीवचे मानद सचिव देवेंद्र भोसले प्रमुख उपस्थित होते.
जि. प. सदस्य नाईक म्हणाले, सह्याद्रीच्या पर्वतरांगात आपला तालुका येतो. तालुक्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. येथे असणारे बिबटे, गवे, रानडुक्कर सारखे वन्य प्राणी अन्नाच्या शोधात बाहेर येताहेत. उसाच्या शेतात जन्मलेल्या बिबट्याचे वास्तव्याचे ठिकाण व त्याच्या दृष्टीने जंगल हे ऊस शेतीच बनले आहे. शिराळा तालुक्यात ऊस शेतीचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे मानवी वस्तीजवळ वन्य प्राण्यांचा वावर जाणवू लागला आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता सतर्क राहणे, योग्य खबरदारी घेणे आणि वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे
ते म्हणाले, गावालगत कुत्री, शेळ्या, मेंढ्या आणि लहान वासरे यांसारखे सहज उपलब्ध होणारे भक्ष्य बिबट्यांना आकर्षित करते. तसेच मटण-चिकनची दुकाने, पोल्ट्री फार्म आणि बंदिस्त नसलेले जनावरांचे गोठे याठिकाणी योग्य खबरदारी न घेतल्यास वन्यप्राण्यांचा वावर जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवणे, गोठे बंदिस्त करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. वाडी, वस्ती व शेतातील वस्तीवरून शाळेला येणाऱ्या शाळकरी मुलांनी प्रवासादरम्यान सतर्क राहावे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन संपन्न झाले. शाळेमार्फत मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार संपन्न झाला. शिक्षक के. वाय. भाष्टे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात अभियानाचा उद्देश, कार्यपद्धतीची माहिती दिली.
विश्वास पाटील, संस्थेचे सचिव सुनील राऊत, संस्थेचे संचालक शकर जाधव व राजेंद्र रावते, सरपचं विजय कराळे, चंद्रकांत पाटील, दिनेश नलवडे, मनीष पाटील, टाकवे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. डी. खाडे, वनरक्षक रजनीकांत दरेकर, दत्तात्रय शिंदे, हणमंत पाटील, एस. एन. पाटील, शिक्षक नानासो गायकवाड, विलास घागरे, अशोक शेवाळे, टाकवे हायस्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मानसिंगभाऊ लोककल्याणचे स्वयंसेवक, तडवळेची स्वरांजली पाटील व अक्षय पाटील, शिराळा वन विभागाचे इतर कर्मचारी आदी मंडळी उपस्थित होती. शिक्षक रमेश सावंत यांनी आभार मानले. मानसिंगभाऊ लोककल्याण मार्फत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.
चित्रफितीद्वारे व सचित्र माहिती
कोल्हापूर वन्य जीवचे मानद सचिव देवेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना बिबट्या बाबतची माहिती देताना त्याच्या जीवनशौली, अन्नसाखळी, आपल्या परिसरात तो कसा आला. येथे जन्मलेल्या बिबट्यांचे जंगल ऊस आहे. त्याच्यापासून शाळकरी मुलांनी व नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा. तो जनावरांवर हल्ला करणार नाही, यासाठी कोण कोणत्या उपाय योजना कराव्यात. मानवावर अथवा पाळीव प्राण्यांवर हल्ला झालाच तर त्याचा प्रतिकार कसा करावा याबाबतची चित्रफितीद्वारे व सचित्र माहिती दिली.









