साखर कामगारांचा २२ तारखेपासून बेमुदत संपाचा इशारा

तात्यासाहेब काळे यांचे आवाहन; थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

ईश्वरपूर : राज्य सरकार साखर कामगार आणि सहकारी साखर कारखानदारीला अडचणीत आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी केला. साखर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या २२ तारखेपासून पुकारलेला बेमुदत संप यशस्वी करून शासनाला कामगारांची ताकद दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या राजारामनगर येथील कार्यस्थळावर साखर कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्य सरचिटणीस राऊ पाटील, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील, सचिव संजय मोरबाळे, सयाजी कदम, संजय पाटील, तानाजी खराडे आदी उपस्थित होते.

काळे म्हणाले, राज्य सरकारने २२ जुलै रोजी कामगार कायदे रद्द करून साखर कामगारांचे संरक्षण काढून घेतल्याचा आमचा आरोप आहे. संबंधित कायदे पूर्ववत करावेत आणि साखर कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, कामगारमंत्री, सहकारमंत्री, कामगार आयुक्त आणि साखर आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कोल्हापूर येथे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात २२ तारखेपासून बेमुदत संपावर जाण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगारांशी संपर्क साधण्यात येत असून संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते राऊ पाटील म्हणाले, राज्यातील साखर कामगारांचे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक वेतन थकीत असून ते तातडीने मिळायला हवे. राज्यातील बंद आणि आजारी साखर कारखाने पुन्हा सुरू करून तेथील कामगारांचे पुनर्वसन करावे. रोजंदारी व कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना सेवेत सामावून घेऊन वेतनश्रेणी लागू करावी. साखर उद्योग आर्थिक अडचणीत असल्याने कारखान्यांना आर्थिक बळ देण्यासाठी साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ करावी, अशा मागण्याही त्यांनी मांडल्या. शासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष प्रदीप शिंदे, अविनाश पाटील आणि तानाजी खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी वाळवा तालुक्यातील साखर कामगार संपात ठामपणे सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शशिकांत सांडगे, चंद्रकांत पवार (सोनहिरा), तानाजी साळुंखे, विजय देशमुख (विश्वास), राजारामबापू कारखान्याचे कामगार प्रतिनिधी विकास पवार, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, योगेश जाधव, विकास पाटील, सचिन कोकाटे यांच्यासह कामगार उपस्थित होते. कामगार प्रतिनिधी मनोहर सन्मुख यांनी आभार मानले.

आणखी वाचा

error: Content is protected !!