कृष्णा हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाचे अर्धशतक

जन्मदात्यांनी मुलांना किडनी दान करून दिले नवजीवन

कराड : खटाव तालुक्यातील शेतकरी युवकाला त्याच्या वडिलांनी, तर पाटण तालुक्यातील तरुणाला त्याच्या आईने किडनी दान करून माणुसकी आणि वात्सल्याचा आदर्श निर्माण केला. या दोन्ही युवकांवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. या दोन प्रत्यारोपणांमुळे कृष्णा हॉस्पिटलमधील यशस्वी किडनी प्रत्यारोपणांची संख्या ५० वर पोहोचली असून, किडनी प्रत्यारोपणाचे ‘अर्धशतक’ पूर्ण झाले आहे. यशस्वी उपचारानंतर दोन्ही रुग्णांसह किडनी दाते असलेल्या त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती उत्तम असून, वैद्यकीय निरीक्षणानंतर चौघांनाही डिस्चार्ज देण्यात आला.

खटाव तालुक्यातील ३५ वर्षीय प्रताप (नाव बदलले आहे) हे शेतकरी असून, गेल्या पाच वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. आजाराची तीव्रता वाढल्यानंतर त्यांना नियमित डायलेसिस घ्यावे लागत होते. कृष्णा हॉस्पिटलमध्येच त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून डायलेसिस उपचार सुरू होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुलाला नवजीवन मिळावे, यासाठी त्यांच्या शेतकरी वडिलांनी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

पाटण तालुक्यातील ३१ वर्षीय संग्राम (नाव बदलले आहे) हे आयटीआय शिक्षित असून खासगी संस्थेत नोकरी करतात. गेल्या वर्षभरापासून त्यांना किडनीच्या आजाराचा त्रास होता. तपासणीनंतर डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. वडिलांचे निधन झाले असल्याने त्यांच्या आईने मुलासाठी किडनी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला.

दोन्ही कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलच्या किडनी ट्रान्सप्लान्ट विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या समुपदेशक वैशाली यादव यांनी किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, उपचारपद्धती तसेच शस्त्रक्रियेनंतरची घ्यावयाची काळजी याबाबत कुटुंबीयांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला.

कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे यांच्या निर्देशानुसार या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. किडनी ट्रान्सप्लान्ट सर्जन डॉ. भूषण पाटील, युरॉलॉजिस्ट डॉ. अनिल हुद्देदार, डॉ. योगेश जाधव, डॉ. अभिजीत काटकर, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. राहुल पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. आदित्य खोत यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.

दोन्ही रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. दात्यांवर ‘लॅपरोस्कोपिक टोटल नेफ्रेक्टॉमी’ या अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांची शस्त्रक्रियेनंतरची रिकव्हरी सुलभ झाली. चौघांचीही प्रकृती उत्तम असून, वैद्यकीय निरीक्षणानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी रुग्ण व किडनी दात्यांची विचारपूस करून त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, नर्सिंग डायरेक्टर रोहिणी बाबर, समुपदेशक वैशाली यादव यांच्यासह डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

किडनी प्रत्यारोपणाचे अर्धशतक

कृष्णा हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ५० किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांमधील रुग्णांसाठी किडनी प्रत्यारोपणाच्या उपचारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून कृष्णा हॉस्पिटल पुढे येत आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!