सांगली : गुलाबाच्या विविध जातींसह जर्बेरा, लिलीयम, कार्नेशन आदी रंगीबेरंगी फुलांची आकर्षक मांडणी करण्यात आलेल्या गुलाब पुष्प प्रदर्शनाला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध फुलांच्या कलात्मक रचना आणि सजावटीमुळे प्रदर्शन नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
सांगली जिल्हा रोज सोसायटीच्या वतीने गेल्या ४८ वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून देणे आणि फुलशेतीला प्रोत्साहन देणे, हा प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे. तसेच कृत्रिम फुलांऐवजी नैसर्गिक फुलांचा वापर वाढावा, यासाठीही प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.
प्रारंभी गुलाब आणि ग्लॅडिएटर या मोजक्या फुलांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचा विस्तार आता मोठ्या प्रमाणात झाला आहे. गुलाबाच्या विविध प्रजातींसोबत जर्बेरा, लिलीयम, कार्नेशन आदी फुलांचा समावेश करण्यात आला आहे. विविध रंग, आकार आणि जातींच्या फुलांची करण्यात आलेली कलात्मक मांडणी हे यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
प्रदर्शनानिमित्त १५ वर्षांखालील मुलांची पुष्परचना, खुली पुष्परचना, बोन्साय, डिश गार्डन आणि टेरारियम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये नागरिकांसह मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून मूकबधिर आणि मतिमंद मुलांना मोफत साहित्य उपलब्ध करून देत त्यांना प्रदर्शनात सहभागी करून घेतले जाते. या मुलांनी साकारलेल्या आकर्षक पुष्परचनांनीही उपस्थितांची विशेष दाद मिळवली.









