नवी दिल्ली : विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील ८२ शिक्षकांचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ९ शिक्षकांचा समावेश आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र, पदक आणि ५० हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षकांमध्ये सैनिक स्कूल, सातारा येथील शिवप्रसाद अरविंद टिंगरे यांचा समावेश आहे. त्यांच्यासह डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे, कुंदा जयवंत बच्छाव, वैभव वसंतराव कुलकर्णी, डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर मोहनराव ताकसांडे, डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे, किरण प्रकाश झरकर आणि अर्चना राकेश जाधव यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.
यंदाच्या पुरस्कारामध्ये ४८ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक आणि १३ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा समावेश आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला, चारित्र्याला आणि विचारांना आकार देऊन सशक्त राष्ट्राची पायाभरणी करतात, असे त्यांनी सांगितले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींना अभिवादन करत राष्ट्रपतींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळबंधू दास यांच्या शैक्षणिक योगदानाचा विशेष उल्लेख केला. अंदमान-निकोबारपासून लडाखपर्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शिक्षकांचे समर्पण कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारताला जगाची ज्ञान आणि कौशल्याची राजधानी बनविण्यासाठी प्राथमिक स्तरापासून तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये आणि कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, उच्च शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजूमदार, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील सन्मानप्राप्त शिक्षक
– डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – साने गुरुजी निवासी माध्यमिक विद्यालय, बीड
– कुंदा जयवंत बच्छाव – महापालिका शाळा, नाशिक
– वैभव वसंतराव कुलकर्णी – जवाहर नवोदय विद्यालय, लातूर
– शिवप्रसाद अरविंद टिंगरे – सैनिक स्कूल, सातारा
– डॉ. विक्रम विशाल – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
– डॉ. अमर मोहनराव ताकसांडे – जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे संस्था, वर्धा
– डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे – शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर
– किरण प्रकाश झरकर – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव
– अर्चना राकेश जाधव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, त्र्यंबकेश्वर, नाशिक










