मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील लाभाचे ऑनलाइन वितरण
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथून थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला.
या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत १२ लाख ५८ हजार २४३ शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे. आतापर्यंत १३ लाख ७० हजार कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक लाभ छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांना मिळाला. या विभागातील ३ लाख २ हजार २७३ शेतकऱ्यांना २ हजार २८४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. अमरावती विभागातील १ लाख ४५ हजार ८०८ शेतकऱ्यांना १ हजार २०८ कोटी, नाशिक विभागातील ८४ हजार ८१३ शेतकऱ्यांना ७५६ कोटी, पुणे विभागातील ४९ हजार २२४ शेतकऱ्यांना ४१७ कोटी, नागपूर विभागातील ४४ हजार ८६४ शेतकऱ्यांना ३६६ कोटी, तर कोकण विभागातील ९ हजार ५४ शेतकऱ्यांना ५४ कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ मिळाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.










