‘मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान’च्या दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिराळा : मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानाच्या माध्यमातून सर्व थरांतील गरजूंची सेवा करण्याचे काम शिराळ्यासारख्या ग्रामीण व डोंगराळ भागात नेटाने सुरू आहे. शिराळ्याची लेक या नात्याने त्याचा मला मोठा अभिमान आहे, असे गौरवोद्गार लेखिका व अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी काढले.
शिराळा उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली आणि मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान, शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नवांगुळ बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते.
सोनाली नवांगुळ पुढे म्हणाल्या, अपंग, अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग आणि मतिमंद व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना तालुक्याच्या ठिकाणीच सेवा उपलब्ध करून देण्याचे काम कौतुकास्पद आहे. मात्र, त्यापुढे जाऊन या व्यक्ती स्वतःची कामे स्वतः कशी करू शकतील, यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी भविष्यात प्रयत्न व्हावेत. तालुक्यातील या घटकांसाठी आपण सहकार्य करण्यास तयार असून, अनेक स्वयंसेवी संस्था व एनजीओही यासाठी पुढे येऊ शकतात. अभियानाने याबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या कोणतीही आर्थिक तोशीस न लागता शासकीय योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्याचे काम सुरू आहे. दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जात आहे. एकाच छताखाली सर्व प्रक्रिया होत असल्याने नागरिकांची सांगलीपर्यंतची धावपळ आणि आर्थिक खर्चही वाचत आहे.
प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक म्हणाले, मानसिंगभाऊ लोककल्याण अभियान हे आता केवळ अभियान राहिले नसून एक चळवळ बनली आहे. तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम विनामोबदला सुरू आहे. लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तालुक्यातील दिव्यांगांसाठी हे दुसरे शिबिर असून, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. मान्यवरांचा लोककल्याण अभियानाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्याचे सभापती सम्राटसिंग नाईक, उपसभापती सविता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, माजी संचालक रणजितसिंह नाईक, माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, संचालक शिवाजी पाटील, यशवंत निकम, विश्वास पाटील, संदीप तडाखे, दत्तात्रय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटे, महादेव कदम, उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. नूतन कणसे, अभिजित नाईक, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, डॉ. दिनकर झाडे, अजय जाधव, गजानन सोनटक्के, सुनील कवठेकर, बाजार समिती सभापती पोपट चरापले, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विशाल ठोंबरे, भिषक डॉ. प्रज्ञा पाटील, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. चिन्मय मेळवंकी, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गजानन साकेकर, मानसतज्ज्ञ माणिकराव सूर्यवंशी यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच व मान्यवर उपस्थित होते. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील यांनी आभार मानले.










