शिराळा : दुष्काळी परिस्थितीमुळे मोरणा नदीचे पात्र कोरडे पडले असून, नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मोरणा धरणातील पाणी कांदे पुलापर्यंत नदीपात्रात सोडून शेतकरी व शेती पिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी पाटबंधारे विभागाकडे केली.
याबाबत नाईक यांनी शिराळा येथे पाटबंधारे विभाग शाखाधिकारी टी. वाय. मुल्ला यांची भेट घेऊन निवेदन दिले. दुष्काळी परिस्थितीमुळे मोरणा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाळू लागली असून, आगामी काळात पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान टाळण्यासाठी मोरणा धरणातील पाणी नदीपात्रात कांदे पुलापर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, ‘विश्वास’ कारखाना संचालक संदीप तडाखे, मांगल्याचे माजी सरपंच राहुल पवार, ‘धनटेक’चे अध्यक्ष सत्यम पाटील, उपसरपंच सागर गंगधर, सतीश पाटील, ॲड. सचिन शेवडे, संतोष उत्तीरकर, विराज महाजन, एस. के. दशवंत, अक्षय पाटील, पंडित निकम, नागेश चरापले, प्रशांत पाटील, रणजीत चरापले, विकास चरापले, अवधूत चरापले आदी उपस्थित होते.









