जात-धर्माच्या बेड्या झुगारून विश्वबंधुत्व स्वीकारा : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के

कै. आनंदराव नाईक यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

शिराळा : जात, पात, धर्म आणि पंथाच्या बंधनांना तिलांजली देऊन विश्वबंधुत्वाला महत्त्व दिले पाहिजे. त्यातूनच समाजाची आणि देशाची खऱ्या अर्थाने सर्वांगीण प्रगती साध्य होऊ शकते, असे आवाहन साताऱ्यातील कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के यांनी केले.

चिखली (ता. शिराळा) येथे मंगळवारी ‘विश्वास’ कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक कै. आनंदराव नाईक (तात्या) यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक होते. ‘विश्वास’ कारखाना व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते.

डॉ. मस्के म्हणाले, सुमारे आठशे वर्षांपूर्वी आपल्याकडे अन्नासाठी संघर्ष सुरू असताना परदेशात ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि पॅरिससारखी शिक्षणाची मोठी केंद्रे उभी राहत होती. त्यामुळे शिक्षणाला आणि भाषाज्ञानाला विशेष महत्त्व आहे. भाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून, इंग्रजीची भीती हा आपला दुबळेपणा आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीसह इतर भाषांचेही ज्ञान दिले पाहिजे. भाषा अवगत झाल्या की संवाद साधता येतो, संवादातून ज्ञान मिळते आणि ज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीची दारे खुली होतात.

भारत हा जगातील तरुणांचा देश असून, देशासमोर प्रगतीची मोठी संधी उपलब्ध असल्याचे सांगत ते म्हणाले, “विश्वबंधुत्व स्वीकारल्यामुळे भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींनी लंडन, ब्रिटन, न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. जगामध्ये मोठे बदल होत असताना आपण जात, धर्म आणि पंथाच्या बेड्यांत अडकून कसे चालणार? विद्यार्थ्यांना केवळ गुण आणि पदव्या मिळविण्यापुरते मर्यादित न ठेवता शिक्षक व पालकांनी त्यांच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे जगाची वेगाने वाटचाल सुरू असल्याचे सांगत डॉ. मस्के म्हणाले, चंद्रावर जाण्याची केवळ कल्पना करणारा मानव आज प्रत्यक्ष तेथे पोहोचला आहे. येत्या दहा ते पंधरा वर्षांत जगात मोठे बदल होणार असून, त्यासाठी नवीन पिढीला तयार करणे आवश्यक आहे.

माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, कै. आनंदराव तात्यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचे काम केले जाते. स्वातंत्र्यलढ्यात शिराळा तालुक्याने मोठे योगदान दिले आहे. हा तालुका संघर्षाचा आणि लढणाऱ्या लोकांचा आहे. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक युवकांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, ते केंद्र व राज्य पातळीवरील विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. विश्वास उद्योग समूहाची वाटचाल ही शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठीची आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनीही मार्गदर्शन केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. आनंदराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ‘आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अमरसिंह नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, तालुक्याचे सभापती सम्राटसिंग नाईक, माजी संचालक रणजितसिंह नाईक, माजी नगरसेवक अभिजित नाईक, ‘विश्वास’चे संचालक सुरेश चव्हाण, बाळासाहेब पाटील, बिरूदेव आंबरे, संभाजी पाटील, दत्तात्रय पाटील, माजी उपसभापती प्रल्हाद पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, विश्वास पाटील, रोहित नाईक, विवेक नाईक, पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कवठेकर, उपाध्यक्ष सदाशिव भंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा परीक्षांत यश संपादन केलेले विद्यार्थी, विविध वर्गांतील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, दहावी व बारावी परीक्षेत तालुक्यात उल्लेखनीय यश मिळविलेले विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. मांतेश हिरेमठ व प्रा. प्रकाश दुकळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी आभार मानले.

आणखी वाचा

error: Content is protected !!