शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न; सभासदांना १२ टक्के लाभांश
कराड : कृष्णा सहकारी बँकेने ५५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, आगामी काळात बँकेचा व्यवसाय २ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याबरोबरच शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
आटके टप्पा (ता. कराड) येथील विराज मल्टिपर्पज हॉल येथे कृष्णा सहकारी बँकेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते बँकेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेचा प्रारंभ झाला.
यावेळी आ. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, बँकेच्या आर्थिक स्थितीत सातत्याने सुधारणा होत असून, सध्या बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १८.०९ टक्के आहे. ते २० टक्क्यांहून अधिक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील पाच वर्षांचे नियोजन करण्यात आले असून, आवश्यक निकष पूर्ण करून रिझर्व्ह बँकेकडे शेड्युल्ड बँकेच्या दर्जासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतर बँकेचा मल्टीस्टेट स्तरावर विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.
पंढरपूर, चिपळूण, नवी मुंबई आणि आष्टा येथे लवकरच चार नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. ग्राहकांना घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळाव्यात, यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार असून, मोबाइल अॅपमध्येही सुधारणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी ठेवी, कर्जवाटप, भांडवल आणि एनपीए यांचा काटेकोर समतोल राखणे आवश्यक आहे. शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मितीला केंद्रस्थानी ठेवून बँकेने वाटचाल करावी. बदलती बाजारपेठ, ग्राहकांच्या गरजा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सातत्याने अभ्यास करून ग्राहकांना अधिक सुलभ सेवा द्याव्यात.
यावेळी बँकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी वार्षिक अहवाल सादर केला. व्हाईस चेअरमन दामाजी मोरे यांनी स्वागत केले, तर शिवाजीराव थोरात यांनी आभार मानले. सभेला संचालक, व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी, सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभासदांना १२ टक्के लाभांश
वार्षिक सभेत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली. सभेने मंजुरी दिल्यानंतर डॉ. सुरेश भोसले यांनी व्यासपीठावरून लॅपटॉपद्वारे ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून क्षणार्धात लाभांशाची रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केली.
मलकापुरात नवे मुख्यालय
कृष्णा बँकेच्या भविष्यातील विस्तारासाठी मलकापूर येथे आधुनिक मुख्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संकुलात मोठे सभागृह तसेच बँकेच्या पुरस्कारांची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. सभासद व ग्राहकांना अभिमान वाटेल, अशा पद्धतीचे हे मुख्यालय उभारण्याचा मानस असल्याचे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.










