जिवंत नागांच्या दर्शनाने शिराळ्यात नागपंचमी उत्साहात

४१ जिवंत नागांचे दर्शन ; भाविकांची अलोट गर्दी

शिराळा : अंबाबाईच्या नावाने ‘चांगभले’चा गजर, गुलालाची उधळण आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली. यंदाच्या नागपंचमी सोहळ्यात ४१ जिवंत नागांचे दर्शन भाविकांना घडले. पावसाची पर्वा न करता भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागपंचमीचा उत्साह अनुभवला.

अंबामाता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी तसेच मानाच्या पालखीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा, पालखी पूजन आणि घरोघरी महिलांनी नागमूर्तीची पूजा करून नागपंचमी साजरी केली. तरुणाईने गाण्यांच्या तालावर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाच्या उधळणीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते.

मानाच्या पालखीची मिरवणूक

नाग मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नागाच्या प्रतिमेचे पूजन करून अंबामातेचे दर्शन घेतले. सकाळी सुमारे १० वाजता मानाच्या पालखीचे प्रमोद महाजन व रामचंद्र महाजन यांच्या घरी पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आली. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, सुनीतादेवी नाईक, रेणुकादेवी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक, राजसिंह पाटील, महेश खंडागळे, अजय जाधव आदींनी पालखीचे पूजन केले. पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीस सुरुवात झाली. ही मिरवणूक रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती.

४१ जिवंत नागांचे दर्शन

दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडविण्यासाठी स्टेजवर नाग सोडण्यात आले होते. नागांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ४१ जिवंत नागांचे दर्शन झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शहरातील मंदिर परिसरात विविध खेळ, खेळण्यांचे स्टॉल, मेवा-मिठाईची दुकाने तसेच लहान मुलांसाठी मनोरंजनाचे स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.

मान्यवरांकडून नाग मंडळांना भेटी

खासदार धैर्यशील माने, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सम्राट महाडिक, भगतसिंग नाईक, रणधीर नाईक, युवानेते केदार नलावडे, माजी सरपंच देवेंद्र पाटील, रणजितसिंह नाईक आदींनी विविध नाग मंडळांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

प्रशासनाच्या नियोजनामुळे उत्सव शांततेत

नागपंचमी उत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस, महसूल आणि वनविभागाने विशेष नियोजन केले होते. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत-पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक विक्रमसिंह कदम, व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. लक्ष्मी, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे आणि मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन केले.

 

दुर्मीळ ‘पांढरा नाग’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

दरम्यान, वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे आढळलेला दुर्मीळ ल्युसिस्टिक (पांढरा) इंडियन कोब्रा यंदाच्या नागपंचमीचे विशेष आकर्षण ठरला. ‘कच्याड युवाशक्ती शिराळा’ यांच्या वतीने हा नाग भाविकांना दर्शनासाठी आणण्यात आला होता. शरीराचा रंग पूर्णपणे पांढरा असून डोळे काळे असलेल्या या ल्युसिस्टिक रंगप्रकारातील नागाला पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या दुर्मीळ नागाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले होते. उत्सव संपल्यानंतर वनविभागाच्या देखरेखीखाली या नागाला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

आणखी वाचा

error: Content is protected !!