कोल्हापूरात १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर भरती

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख नियोजन करण्याची जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची सूचना

कोल्हापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी होणारी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिल्या.

सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी कोल्हापूर मध्ये 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान अग्निवीर भरती होणार आहे. या भरतीच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी संचालक (ARO) कर्नल प्रशांतसिंग, ले. कर्नल संबित पात्रा, सुबेदार मेजर जसविंदर सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भिमसेन चवदार (निवृत्त), जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सरिता थोरात, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले, तहसीलदार स्वप्निल पवार, महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, भरती प्रक्रियेशी संबंधित सर्व विभागांनी योग्य समन्वय ठेवून अग्निवीर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडावी. भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार येण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या बसेस, भोजन, पिण्याचे पाणी, फिरती स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध करुन द्या. या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी चोख वाहतूक व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था करा. गर्दी होणारे मार्ग वळवण्याची कार्यवाही करा. उमेदवारांच्या धावण्याचा मार्ग स्वच्छ करून घ्या. मैदानावरील गवत काढून घ्या तसेच या जागेवर पावसाचे पाणी आडून राहणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी संचालक (ARO) कर्नल प्रशांतसिंग यांनी भरती प्रक्रियेसाठी महसूल, पोलीस, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभाग तसेच अन्य विभागाचे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले. तसेच अग्निवीर भरती पूर्णपणे गुणवत्ता आणि पात्रतेच्या आधारावर होणार असल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आर्थिक आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

या भरती प्रक्रियेत 29 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या महिला सेना पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठवण्यात येणार असून भरती प्रक्रिया 16 सप्टेंबरच्या रात्रीपासून कोल्हापूर येथे सुरू होणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आणखी वाचा

error: Content is protected !!