सोलापूर : भाजप सरकारने विविध समाजांना आश्वासन देत फसवले असून आता कोणत्याही आश्वासनाला मराठा समाज बळी पडणार नाही. भाजप सरकारचे सर्व डाव संपले, असून आता माझा डाव सुरू होईल, असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्राचे मुद्द्यावरून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकाची व्हॅलिडीटी होते आणि रद्द कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोरील भिंतीवर साकारण्यात आलेल्या शिवशिल्पाचे अनावरण म्हणून जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.
कुणबी प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत होत असलेल्या दुजाभावावरून जरांगे- पाटील यांनी संताप व्यक्त केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जरांगे-पाटील यांनी निशाणा साधला. मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द करण्याबाबत गुप्त पत्र देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. बावनकुळे यांनी पत्र देऊन मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. ते पत्र माझ्या हाती आले आहे, असे ते म्हणाले.
शिंदे समिती आणि संबंधित अधिकाऱ्यांनी मूळ नोंदी शोधून काढले असताना त्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्याऐवजी ती रद्द करण्याचे प्रयत्न का होत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आगामी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना जरांगे- पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने मोठ्या संख्येने अंतरवली सराटीकडे यावे असे आवाहन केले.










