उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

सांगली : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत यंदा प्रथमच या स्पर्धेची व्याप्ती तालुका स्तरापासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढविण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

स्पर्धेत संबंधित यंत्रणेकडे नोंदणीकृत संस्था अथवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच सहभागी होता येणार आहे. पात्र मंडळांनी ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ सप्टेंबर २०२६ आहे.

मागील सलग दोन वर्षांत राज्य अथवा जिल्हास्तरीय पारितोषिक मिळविलेली मंडळे यंदाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाहीत. ही अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठीही लागू राहणार आहे.

विजेत्यांना भरघोस पारितोषिके

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी २ लाख ५० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विधायक उपक्रमांनाही प्रोत्साहन

स्पर्धेच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळा आणि व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहेत. घरोघरच्या बाप्पांची छायाचित्रे अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तसेच प्रसिद्ध गणपती मंदिरे आणि गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे घरबसल्या थेट दर्शन घेण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी उत्सवाचा इतिहास, आर्थिक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि विधायक कार्यक्रमांचे संयोजन या विषयांवर प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केली जाणार आहे.

स्पर्धेची सविस्तर माहिती व अर्जाचा नमुना ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर तसेच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे संपर्क साधावा.

आणखी वाचा

error: Content is protected !!