पंचगंगा प्रदूषणावर बैठकीत राजू शेट्टींचा घणाघात;
१५ दिवसांत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे करणार प्रत्यक्ष पाहणी
मुंबई/कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरातील प्रदूषणाची गंभीर परिस्थिती मांडत प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कॉमन एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) प्रकल्प रखडल्याचा मुद्दा शेट्टी यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या ‘टक्केवारी’च्या राजकारणामुळे हे प्रकल्प रखडल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इचलकरंजीतील प्रकल्पाची वर्क ऑर्डर होऊन वर्ष उलटले असतानाही केवळ पाच टक्के काम झाल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील प्रक्रिया न केलेले दूषित सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. ग्रामीण भागातील ८९ गावांच्या सांडपाणी व्यवस्थापनासाठी २०७ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्यात आला असून निधीअभावी तो प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
इचलकरंजीतील CETP प्रकल्प चालविण्याचा खर्च परवडत नसल्याचे कारण पुढे करून प्रकल्प बंद ठेवला जात असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. त्यामुळे काही उद्योगांचे दूषित रासायनिक पाणी रात्रीच्या वेळी थेट नदीत सोडले जात असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
पंचगंगा नदीकाठच्या गावांतील शेतीला नोव्हेंबरपासून पावसाळा सुरू होईपर्यंत दूषित पाण्याचा वापर करावा लागत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. पाटबंधारे विभागाकडून आकारण्यात येणारा ‘उपसा सिंचन कर’ पूर्णपणे माफ करावा, अशी आग्रही मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
शेट्टी यांनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला तातडीने चौकशीचे आदेश दिले. तसेच येत्या १५ दिवसांत स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात येऊन पंचगंगा नदीकाठच्या गावांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
दरम्यान, या बैठकीला पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्मिन, जिल्हाधिकारी विजय राठोड, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिकांचे आयुक्त तसेच पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर आता थेट प्रत्यक्ष पाहणी होणार असल्याने रखडलेले CETP आणि ZLD प्रकल्प मार्गी लागणार का, तसेच प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कारवाई होणार का, याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










