मराठा समाजाने मोठी एकजूट दाखवण्याची ही वेळ : मनोज जरांगे-पाटील

२९ ऑगस्टपर्यंत शहाणे व्हा, अन्यथा संघर्ष अटळ : फडणवीस-शिंदे सरकारवर मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

बोरगाव : मराठ्यांसाठी मी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. अंतरवाली सराटीतील हे माझे शेवटचे निर्णायक आंदोलन असणार आहे. आयुष्यात मी मराठ्यांची कधीही गद्दारी करणार नाही. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाने मोठी एकजूट आहे, हे दाखवण्याची ही वेळ आली आहे. मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना राजकीय इशारा देताना ते म्हणाले, जो मराठ्यांना संपविण्याचा प्रयत्न करेल, त्यांना राजकारणातून संपूर्णपणे संपवून टाकू.
फडणवीस आणि शिंदे यांनी आता तरी २९ ऑगस्टपर्यंत शहाणे व्हावे. मराठ्यांपुढे शहाणपण चालणार नाही. असा इशारा फडणवीस-शिंदे सरकारला मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.

बोरगाव (ता. वाळवा) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मराठा समाज बहुसंख्येने उपस्थित होता. बोरगावात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी दहा जे सी बी मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच पंचवीस फुट उंचीचा हार घालण्यात आला.

जरांगे पुढे म्हणाले, या राज्यातील एकही शेतकरी सुखी नाही. कोणत्याही जाती-धर्माचा माणूस सुखी नाही. ओबीसी, दलित, मुस्लिम, मराठा कोणताही समाज सुखी नाही. शेतकऱ्यांचे पूर्ण वाटोळे करण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे.सरकारला प्रत्येकवेळी दादागिरी करण्याचा आणि आपले कोणीच काही करू शकत नाही, असा गर्व व माज चढला आहे. हा माज पहिल्यांदा मराठ्यांनी उतरवला पाहिजे. मराठ्यांमध्येच फूट पडावी आणि मराठा समाजाची वाट लागावी, यासाठी सरकारने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. शेतमालाला भाव नाही, शिक्षण महागले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना जरांगे-पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. दुसरीकडे शिक्षण प्रचंड महाग झाले आहे. मुला-मुलींना शिकविण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. शिकल्याशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाशिवाय नोकरी मिळत नाही. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे कसे, हा आज मोठा प्रश्न आहे.

ओबीसींच्या आरक्षणातील एक टक्काही मागत नाही

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसींचे एक टक्के आरक्षण आम्हाला द्या, अशी आमची मागणी नाही. तुम्हाला ३२ टक्के आरक्षण आहे, त्यातील एक टक्काही आम्हाला नको. मात्र जे कुणबी आहेत, ते ओबीसीमध्येच आहेत. त्यासंदर्भातील नोंदी मी शोधून देतो. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी मोठा डाग पुसला

सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठा एक होत नाही, हा मराठा समाजावरील फार मोठा डाग होता. तो डाग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी पुसून काढला आहे. मला पश्चिम महाराष्ट्रातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांचा अभिमान वाटतो. आपल्या लेकराबाळांपेक्षा दुसरे काहीही मोठे नाही, हे मराठा समाजाने सिद्ध केले आहे, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

मराठ्यांना संपविणाऱ्यांना राजकारणातून संपवू
२९ ऑगस्टनंतर एकदा आंदोलन सुरू झाले, तर कोणालाही सोडणार नाही. शिंदे-फडणवीस यांनी आपली चूक दुरुस्त करावी. संघर्षाशिवाय पर्याय नाही.

फडणवीस यांनी काही नेत्यांना पुढे करून मराठा समाजाविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला. सरकारने समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न थांबवावेत, अशी मागणी त्यांनी केली.

बोरगाव येथील सभेत जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासोबतच शेतकरी, शिक्षण, रोजगार आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींचे प्रश्न उपस्थित करत सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणाला उपस्थित मराठा समाजबांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आणखी वाचा

error: Content is protected !!