वनश्री निवासस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार

सम्राट महाडीक व राहुल महाडीक यांच्या उपस्थितीत स्वागत; पायाभूत सुविधांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा

ईश्वरपूर : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी पेठ नाका येथील वनश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडीक यांच्या उपस्थितीत ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान ईश्वरपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, पूल, प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत विविध विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारसंघातील विकासकामांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. रस्ते व इतर पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी भूमिका त्यांनी चर्चेदरम्यान मांडली. स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्नांची माहिती घेऊन त्याबाबत आवश्यक त्या विभागांशी समन्वय साधण्याचे संकेतही त्यांनी दिले.

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल आणि दळणवळणाच्या सुविधा मजबूत झाल्यास उद्योग, शेती, व्यापार आणि नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीला मोठी चालना मिळेल, यावरही बैठकीत चर्चा झाली. विकासकामांच्या नियोजनात स्थानिक गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्राधान्य देण्याबाबतही विचारविनिमय झाला. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य मिळावे, तसेच विविध प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, याबाबत महाडीक बंधूंनी मंत्री भोसले यांच्या निदर्शनास विविध विषय आणून दिले.

यावेळी मंडलाध्यक्ष डॉ. सचिन पाटील, राज्य परिषद सदस्य जयकर कदम, माजी जिल्हा परिषद सभापती जगन्नाथ माळी, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, पंचायत समिती सदस्य प्रदीप कांबळे, पंचायत समिती सदस्य समर्थ पाटील, सुजित थोरात, सरगम मुल्ला, शंकर पाटील, अमीर ढगे, हर्षवर्धन पाटील, संग्राम गोइंगडे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!