महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद; महिलांनी स्वतंत्र राहू नये मनुस्मृतीचा डाव : राहुल गांधी

पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधींचे वक्तव्य; ‘पिंजरा तोडा’चा दिला संदेश

पुणे : महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असून, देशातील मुलींनी स्वतंत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केले. महिलांनी कधीही स्वतंत्र राहू नये, त्यांच्यावर बंधने असावीत, हा मनुस्मृतीचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ‘पिंजरा तोडा’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. शिक्षण, नोकरी तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांना आणि मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

महिला स्वतःशिवाय कोणालाही बांधील नाहीत. महिलांवर कोणत्याही पुरुषाचा अधिकार नाही. महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविले असतानाही त्यांना एका विशिष्ट चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली. शिक्षणाच्या क्षेत्रातही मुला-मुलींमध्ये भेदभाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मी येथे राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही,’ असे स्पष्ट करत राहुल गांधी म्हणाले की, तरुणांची लोकसंख्या ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. देशातील सुमारे ७० कोटी लोकांची स्वप्ने आणि त्यांचे विचार हीच भारताची खरी ताकद आहे. या ताकदीला योग्य संधी मिळणे आवश्यक आहे.

महिलांच्या वेतनातील तफावतीवर भाष्य

महिलांना पुरुषांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के कमी वेतन मिळते, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच ८४ टक्के महिलांना काम करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, असेही त्यांनी नमूद केले. महिलांना समान सन्मान आणि स्वातंत्र्य मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना देशात हिंसा आणि अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधून आपले अनुभव मांडले. शिक्षण घेताना, नोकरी करताना तसेच सार्वजनिक जीवनात वावरताना येणाऱ्या अडचणी त्यांनी सांगितल्या. मुलींवर विविध प्रकारची बंधने लादली जात असल्याचेही विद्यार्थिनींनी नमूद केले.

पुणे म्हणजे प्रेम

पुण्याविषयी बोलताना राहुल गांधी यांनी ‘पुणे म्हणजे प्रेम’ अशी भावना व्यक्त केली. महिलांना आणि मुलींना सुरक्षित, स्वतंत्र आणि समान संधी मिळाल्यास देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळेल, असा संदेश त्यांनी या कार्यक्रमातून दिला.

आणखी वाचा

error: Content is protected !!