राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील चार शिक्षकांची निवड

देशभरातील ४८ शिक्षकांचा गौरव; ५ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीतून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर १५ जून ते २० जुलै २०२६ या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते.

महाराष्ट्रातील चार शिक्षकांची राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याने राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!