राज्यात PUC शुल्कात वाढ

दुचाकीपासून डिझेल वाहनांपर्यंत सुधारित दर लागू

परिवहन विभागाचे परिपत्रक जारी; सर्व PUC केंद्रांवर सुधारित शुल्क आकारणी बंधनकारक

मुंबई : राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी देत याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांवर सुधारित दरानुसारच शुल्क आकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात सुधारित शुल्काचे दर स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक वायुप्रदूषण नियंत्रण केंद्राच्या दर्शनी भागात सुधारित दरांचा फलक ठळकपणे लावण्याचे निर्देश केंद्र चालकांना देण्यात आले आहेत.

कोणत्या वाहनासाठी किती शुल्क?

परिवहन विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत दरानुसार दुचाकी वाहनांच्या PUC तपासणीसाठीचे शुल्क ५० रुपयांवरून ६० रुपये करण्यात आले आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या तीनचाकी वाहनांसाठीचे शुल्क १०० रुपयांवरून १२० रुपये करण्यात आले आहे.

पेट्रोल, CNG आणि LPG वर चालणाऱ्या वाहनांसाठीचे शुल्क १२५ रुपयांवरून १५० रुपये करण्यात आले आहे. तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या PUC तपासणीचे शुल्क १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात आले आहे.

दरफलक लावणे बंधनकारक

परिवहन विभागाने राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या मालकांना त्यांच्या केंद्राच्या दर्शनी भागात सुधारित शुल्काचे दर ठळकपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना PUC तपासणीसाठी नेमके किती शुल्क आकारले जाणार आहे, याची स्पष्ट माहिती मिळावी, हा यामागील उद्देश आहे.

सुधारित दरानुसारच वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांकडून शुल्क आकारले जात आहे की नाही, याबाबत खातरजमा करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घेण्यास परिवहन विभागाने स्पष्टपणे सांगितले आहे.

मनमानी शुल्क आकारल्यास कारवाईची शक्यता

PUC केंद्रांकडून सुधारित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्यास त्याची दखल घेण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी PUC केंद्रावर लावण्यात आलेला अधिकृत दरफलक पाहूनच शुल्क भरावे, तसेच जादा शुल्क आकारल्यास संबंधित परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व वायुप्रदूषण नियंत्रण केंद्रांना आवश्यक सूचना देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही परिपत्रकातून देण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय

PUC केंद्रांच्या शुल्काबाबत महाराष्ट्र स्टेट PUC सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी परिवहन विभागाकडे दरवाढीची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने विभागाने समिती गठित करून राज्यातील वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या दरांचा अभ्यास केला. समितीच्या अहवालानंतर संबंधित बाबींवर विचार करून सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान, All PUC Centers Owners Association विरुद्ध State of Maharashtra आणि अन्य या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ४ मे २०२६ रोजी आदेश दिला होता. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर तसेच शासनाच्या संबंधित पत्रव्यवहारानंतर परिवहन विभागाने PUC शुल्कात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन दरांमुळे वाहनधारकांच्या PUC तपासणीच्या खर्चात काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी वायुप्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने वाहनांची नियमित तपासणी आणि वैध PUC प्रमाणपत्र ठेवणे महत्त्वाचे आहे. सुधारित शुल्काची अंमलबजावणी राज्यातील सर्व PUC केंद्रांवर करण्याचे निर्देश परिवहन विभागाने दिले आहेत.

आणखी वाचा

error: Content is protected !!