गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

मुंबई : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आता एसटी सज्ज झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत ५,२२० जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

या जादा बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवाशांना बसस्थानकांवर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाईल ॲपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.

१० ऑगस्टपासून गट आरक्षणास प्रारंभ
किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ७ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेसचे संचालन करण्यात येणार आहे.


गणेशोत्सवाच्या काळात एसटीची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सर्व प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असून, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड सेवा देण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!