महाडीक मल्टीस्टेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
ईश्वरपूर : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडीक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या वनश्री नानासाहेब महाडीक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, ईश्वरपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्राईम टायकॉन इंडिया लिमिटेड, पुणे यांच्या वतीने ‘भारत उद्योग सन्मान पुरस्कार २०२६’ अंतर्गत संस्थेचे कर्तव्यदक्ष चेअरमन सतीश शिवाजीराव महाडीक यांना ‘आदर्श चेअरमन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
सतीश महाडीक यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने सहकार व वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेची उत्कृष्ट कार्यपद्धती, विश्वासार्ह सेवा आणि सातत्यपूर्ण प्रगतीची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे महाडीक मल्टीस्टेटच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाडीक मल्टीस्टेटने यापूर्वीही विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त केले असून, आपल्या कार्यक्षम व्यवस्थापनाच्या बळावर महाराष्ट्रातील एक आदर्श आणि विश्वासार्ह संस्था म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते सतीश महाडीक यांना ‘आदर्श चेअरमन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. प्रदीप पाटील, जनरल मॅनेजर आर. एम. बागडी, अजित पाटील, बहे शाखेचे मॅनेजर मानसिंग पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सतीश महाडीक यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल संस्थेचे सभासद, कर्मचारी, हितचिंतक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










