१,१९८ कर्मचाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रश्न मार्गी लागणार ; नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिवांना उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिले.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एकूण १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेवर एकाचवेळी मोठा आर्थिक बोजा पडू नये, यासाठी सध्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने सेवेत सामावून घ्यावे, तर उर्वरित कर्मचाऱ्यांबाबत नंतर निर्णय घ्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पदे भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या बैठकीस सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्र यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.










