नेत्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेशिका, स्वतंत्र बैठक व्यवस्था द्या

पोलिस अधीक्षकांना स्वीय सहायकांचे निवेदन; मागणी मान्य करून तोडगा काढण्याचे आश्वासन

सांगली : राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी स्थानिक राजकीय नेत्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश दिला जातो; मात्र त्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नेत्यांच्या स्वीय सहायकांनाही प्रवेशिका देऊन स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांच्या स्वीय सहायकांनी केली आहे.

या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या स्वीय सहायकांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पोलिस अधीक्षकांनी स्वीय सहायकांचे म्हणणे जाणून घेतले. त्यांची मागणी रास्त असल्याचे मान्य करून यावर लवकरच योग्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यापूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या स्वीय सहायकांची बैठक झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करून त्यानंतर पोलिस अधीक्षकांना स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व मंत्री, राज्यपाल तसेच अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांसाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशपत्र दिले जाते. मात्र, त्यांच्या स्वीय सहायकांना प्रवेश दिला जात नाही.

नेत्यांना कार्यक्रमस्थळी निवेदन, विविध कागदपत्रांच्या फाईल्स, सत्कार साहित्य तसेच अन्य आवश्यक बाबी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीय सहायकांची असते. त्यामुळे त्यांनाही कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांची बैठक व्यवस्था व्यासपीठाजवळ स्वतंत्रपणे करण्यात यावी. नेत्यांच्या प्रवेशपत्रासोबत त्यांच्या स्वीय सहायकांसाठी स्वतंत्र प्रवेशिका देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर अमोल कोरे, राकेश कुंभार, संजय कुलकर्णी, विनायक मुंगळे, नेताजी पाटील, वैभव नलवडे, अमोल कणसे, चंदू कोळेकर, इरफान जमादार, सुनील जाधव, विनायक नायकवडी, सचिन सावंत, शहाजी पांढरे, कुंडलीक कोळेकर, शेखर डुग्गी, सूरज सावंत, आदिनाथ कपाले, सूरज चव्हाण, समाधान शिंदे, विश्वास महिंद, शंकर खानवीलकर, प्रशांत पाटील, महेबुब मुतवल्ली, अक्षय पाटील, दीपक लकेसर, उमेश हुंडावळे, शिव भोसले, विशाल लाड, सतीश हेळवी, प्रशांत चव्हाण, चेतन शिकलगार, दीपक जाधव, मनोहर मासाळ आणि महावीर होरे आदी स्वीय सहायकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आणखी वाचा

error: Content is protected !!