कागल : कागल तालुक्यातील मेतके येथे स्वतः सद्गुरू बाळूमामा यांनी स्थापन केलेला ‘अद्वितीय रणखांब’ श्रावण महिन्याच्या निमित्ताने भक्तांना दर्शनासाठी गुरुवारी १३ ऑगस्ट पासून खुला करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे या १४ फूट उंचीच्या खांबावरील पंचधातूचे आवरण काढून भाविकांना दर्शनासाठी खुला होईल. भाविक या खांबाचे दर्शन घेऊन मोठ्या भक्तिभावाने खांबाभोवती फेऱ्या मारतात.
स्वतः बाळूमामांनी रोवलेला आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेला रणखांब अन्य कुठेही नसल्याने त्याच्या दर्शनासाठी प्रचंड रांगा लागतात. मूळ सागवानी लाकडात असलेल्या या रणखांबाची झीज होऊ नये म्हणून २००७ मध्ये त्याच्यावरवर पंचधातूचे आवरण चढविले होते. त्यामुळे तो सुरक्षित झाला. मात्र, तो वर्षातील ११ एक महिने पंचधातूत झाकलेल्या स्थितीत असल्याने त्याचा भाविकांना थेट स्पर्श करता येत नाही. त्यामुळे श्रावण महिन्यात हा रणखांब खुला केला जातो.










