आणखी ६०० पदांसाठी जाहिरात ; २५० दंतचिकित्सकही आरोग्य सेवेत दाखल होणार; १२४ नव्या आरोग्य संस्थांचे लोकार्पण
मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून मनुष्यबळ आणि आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला जात आहे. येत्या काही दिवसांत राज्यात १ हजार ४४० डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून, आणखी ६०० डॉक्टरांच्या पदांसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. तसेच सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेत उपलब्ध होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही आबिटकर यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. यावेळी राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा थेट आढावा घेण्यात आला.
आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या उपस्थितीपासून रुग्णालयातील सुविधांपर्यंत आढावा
‘जन आरोग्य संवाद’दरम्यान आरोग्य समित्यांच्या बैठका नियमितपणे होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का, तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा आणि सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबत थेट माहिती घेण्यात आली.
स्थानिक पातळीवर आरोग्य संस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. आरोग्य व्यवस्था केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातही जन आरोग्य योजनेचा विस्तार
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे राज्यातील कोणताही गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, हा शासनाचा प्रयत्न असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक सुविधांच्या धर्तीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्येही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत ती रुग्णालये अद्ययावत करण्यात येणार आहेत. ‘निरोगी महाराष्ट्र-सुदृढ महाराष्ट्र’ घडविण्यासाठी आरोग्य विभाग अधिक सक्षम आणि लोकाभिमुख केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
१२४ नव्या आरोग्य संस्थांचे लोकार्पण
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात नव्याने उभारण्यात आलेल्या १२४ आरोग्य संस्थांचे, तसेच विविध रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या कामांचे ऑनलाइन लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
यावेळी आबिटकर म्हणाले की, १२४ आरोग्य संस्थांचे लोकार्पण हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दृष्टीने संस्मरणीय क्षण आहे. वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या अभावामुळे काही ठिकाणी आरोग्य संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत नव्हत्या. अशा संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.
आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. डॉक्टर आणि दंतचिकित्सकांच्या आगामी नियुक्त्यांमुळे ग्रामीण तसेच दुर्गम भागातील आरोग्य सेवेला आणखी बळ मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य संस्थेत दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.










