सगळं ठरलं होतं, पण गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश थांबला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला मोठा गौप्यस्फोट

कराड : भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयार होते. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रात मंत्रिपद देण्याची त्यांनी घातलेली अट आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या भूमिकेमुळे हा प्रवेश होऊ शकला नाही, असा मोठा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. १५ ऑगस्ट रोजी केलेल्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची परवानगीही घेतली होती. मुंडे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यासोबत गुप्त बैठका झाल्या होत्या. या बैठकींमध्ये काँग्रेस प्रवेशाबाबत जवळपास सर्व काही निश्चित झाले होते, असा दावा चव्हाण यांनी केला.

‘मंत्रिपद द्या, अन्यथा निवडून येणे कठीण’

मुंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी केंद्रात मंत्री करण्याची अट ठेवली होती, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर काँग्रेसकडून निवडणूक लढवावी लागेल. मात्र, भाजपमधील नागपूरच्या दोन नेत्यांमुळे आपल्याला निवडून येणे कठीण होईल, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली होती, असा दावा चव्हाण यांनी केला.

मुंडेंना थेट कॅबिनेट मंत्री करणे शक्य होईल की नाही, याची खात्री नसली तरी राज्यमंत्री करता येईल, असे आपण त्यांना सांगितले होते, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रात्री दोन वाजता अहमद पटेलांसोबत बैठक

या राजकीय घडामोडी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू होत्या, असे चव्हाण यांनी सांगितले. मुंडे यांच्या प्रवेशाची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून आपण महाराष्ट्र सदनात न थांबता दुसऱ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे होते. रात्री दोन वाजता अहमद पटेल आणि इतर नेत्यांसोबत बैठका झाल्या आणि मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली, असे चव्हाण यांनी सांगितले.

गोपीनाथ मुंडे त्यावेळी भाजपचे मोठे नेते होते; मात्र ते पक्षात अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी आपल्याशी त्या काळात काही महत्त्वाच्या राजकीय बाबी शेअर केल्या होत्या, मात्र त्या आता जाहीर करणे योग्य ठरणार नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.

मनमोहन सिंगांचा मंत्रिपदाला विरोध

यानंतर आपण तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मात्र, त्यांना न विचारता सोनिया गांधी यांच्याकडून परवानगी घेऊन मुंडेंना आश्वासन देणे ही आपल्या राजकीय कारकिर्दीतील मोठी चूक ठरली, असे चव्हाण यांनी सांगितले.

विरोधी पक्षातील खासदाराला काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्याला थेट केंद्रात मंत्री करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना दिलेले मंत्रिपदाचे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि अखेर त्यांचा काँग्रेस प्रवेश रखडला, असा दावा चव्हाण यांनी केला आहे.

‘मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे आणि मंत्री करायचे याबाबत पंतप्रधानांची भूमिका महत्त्वाची असते. त्यांना आधी न विचारता निर्णय घेणे ही माझी चूक होती,’ अशी कबुलीही चव्हाण यांनी दिली.

मनमोहन सिंग यांच्या भूमिकेनंतर आपण पुन्हा गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली आणि काँग्रेस प्रवेशाबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मुंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकला नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मला जे माझे वडील कळले, ते कमळातच जन्मले आणि कमळातच विसावले आहेत. त्यांचा पूर्ण प्रवास भाजपात आहे

भाजप नेत्या पंकजा मुंडे

पृथ्वीराज चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक वेगळाच आणि आतापर्यंत चर्चेत न आलेला पैलू समोर आला असून, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!