ईश्वरपूर शहरात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारणार : आ. जयंत पाटील

ईश्वरपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान, लोककल्याणकारी आणि प्रजावत्सल राज्यकर्त्या होत्या. त्यांनी आपल्या प्रजेवर पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. त्यांचा जाज्वल्य इतिहास आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे, ईश्वरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचा पुनरुच्चार माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उरुण-ईश्वरपूर येथील पक्ष कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांचे कल्याण,न्यायदान आणि समाज सेवेसाठी समर्पित केले. त्यांनी दळण वळणाची कमी साधने असतानाही संपूर्ण देशात काशी,अयोध्या,बद्रीनाथ,सोमनाथ आधी अनेक तीर्थस्थानांचा जिर्णोद्धार केला. त्यांनी मंदीर,घाट, रस्ते,पूल,धर्मशाळा बांधल्या असून भाविकांसाठी अन्नछत्रे सुरु केली. त्या कोणत्याही प्रसंगाला घाबरल्या नाहीत, उलट त्या मोठ्या धैर्याने संकटाला सामोरे गेल्या आणि संकटावर मात केली.
आमदार जयंत पाटील

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर दानशूर, पराक्रमी आणि धाडसी होत्या. त्यांचा इतिहास युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून ईश्वरपूर शहरात लवकरच त्यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, गटनेत्या अरुणादेवी पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्ष सुनिता देशमाने, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, प्रदेश सदस्य कमल पाटील, माजी शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी आभार मानले.

आणखी वाचा

error: Content is protected !!