साखराळेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभामंडपाचा लोकार्पण सोहळा
ईश्वरपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना हा वाळवा तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, साखराळे गावाच्या विकासात कारखान्याचे मोठे योगदान आहे. भविष्यात राजारामबापू साखर कारखाना प्रगतीचे नवे पाऊल उचलेल, असा विश्वास माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
साखराळे येथे ७० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभामंडपाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता पाटील, पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील व स्व. बाबासाहेबदादा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
आ. जयंतराव पाटील म्हणाले, एखादा माणूस अडचणीत सापडला की देवाचा धावा करतो आणि देवाकडे धाव घेतो. पंढरीचा विठ्ठल हा राज्यातील सर्वसामान्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे; मात्र पंढरपूर या महामार्गापासून दूर गेले आहे. सरकारने विकासाची संकल्पना राबविताना शेतकरी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. युवा पिढीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा स्वीकार करून एकरी उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
बाळासाहेब पाटील म्हणाले, साखराळे गावाच्या विकासात लोकनेते राजारामबापू पाटील आणि आ. जयंतराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आ. जयंतराव पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी माणसे नेमावी लागतात, यातच जयंतराव पाटील यांचे मोठेपण आहे.
विजयराव पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील आणि आ. जयंतराव पाटील यांनी साखर कारखान्यासह विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केला आहे. हे योगदान आम्ही कदापि विसरू शकत नाही.
यावेळी उदयसिंह पाटील, विठ्ठल चव्हाण, प्रकाश पाटील, वंदना चव्हाण, अंजली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सरपंच सुजाता डांगे यांनी स्वागत केले, तर उपसरपंच सचिन पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच बाबुराव पाटील यांनी आभार मानले. प्रा. अमोल पाटील व प्रा. डॉ. सुरज चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










