नागरिकांच्या मागण्या तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा
मांगले : मांगले येथील नांदोली व निळकंठ वसाहतीमध्ये विकासकामे आणि नागरिकांच्या विविध अडीअडचणींबाबत जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत दोन्ही वसाहतींमधील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांबरोबरच नवीन विकासकामांच्या नागरिकांच्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांनी मांडलेल्या विविध अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा झाली.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावरून कोणती कामे करता येतील, याचा विचार करून शक्य असलेली कामे प्राधान्याने व सत्वर मार्गी लावली जातील, अशी ग्वाही जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी दिली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘विश्वास’चे संचालक सुरेश पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, उपसरपंच सागर गंगधर, माजी सरपंच राहुल पवार, राजेंद्र दशवंत, ग्रामपंचायत सदस्य लहू पाटील, ईश्वर पाटील, नथुराम पाटील, भरत पाटील, अरविंद पाटील, विष्णू पाटील, विष्णू जाधव यांच्यासह दोन्ही वसाहतींमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










