शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; मोजणीला आल्यास दरोडेखोरांसारखी वागणूक देऊ

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक भव्य मोर्चा; राजू शेट्टी, जयंत पाटील, सतेज पाटील यांच्यासह हजारोंचा सहभाग

सांगली : शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. या महामार्गाच्या मोजणीसाठी अधिकारी आले, तर त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक देऊ, असा इशारा शक्तीपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी सांगलीत देण्यात आला.शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात हजारो शेतकरी, महिला, युवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार शिवाजीराव नाईक, कॉम्रेड धनाजी गुरव, बी. जी. पाटील यांच्यासह विविध नेते सहभागी झाले होते. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. सिमेंट कंपन्या आणि कंत्राटदारांच्या फायद्यासाठी हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या मार्गाला समांतर महामार्ग उपलब्ध असतानाही शक्तिपीठचा आग्रह का धरला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महामार्गामुळे बारमाही शेती बाधित होण्याबरोबरच रस्त्याच्या उंचीमुळे आजूबाजूची शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या महामार्गाला विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार जयंत पाटील म्हणाले, नागपूर ते पत्रादेवी या मार्गासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध असताना आणि नागरिकांची मागणी नसतानाहीशक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आजवर विविध मागण्यांसाठी आंदोलने झाली; मात्र कंत्राटदारांचे आंदोलन कधी झाले नव्हते. कंत्राटदारांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची देयके थकीत असताना एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा आग्रह कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. ‘हा वसंतदादा पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जिल्हा आहे. या भूमीचा इतिहास क्रांतिकारकांचा आहे. सरकारने हा इतिहास लक्षात घेऊनश क्तिपीठ महामार्गाबाबत पुनर्विचार करावा,’ असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

आमदार सतेज पाटील म्हणाले, विविध योजनांच्या माध्यमातून गरीबांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. मात्र, एक लाख दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज काढून महामार्ग उभारण्याचे नियोजन केले जात आहे. सरकारकडे एवढा निधी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांच्या संवर्धनासाठी प्रत्येकी ५०० कोटी रुपये द्यावेत. तसेच राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी एक कोटी रुपये देऊन गावातील रस्ते, शाळा आणि मूलभूत सुविधा सुधाराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी अथवा संपादनाच्या प्रक्रियेसाठी खासगी व्यक्ती शेतकऱ्यांकडे येण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींना शेतकऱ्यांनी थारा देऊ नये, असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.

 

मोर्चात वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यांतील बाधित गावांमधून हजारो शेतकरी, महिला, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.

आणखी वाचा

error: Content is protected !!