जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांमध्ये आ.जयंत पाटील यांनी लक्ष घालावे ; आटपाडीच्या जेष्ठ नागरिकांचे साकडे

आटपाडी तालुक्यात राजारामबापू उद्योग समूहातील संस्थांच्या शाखा सुरु कराव्यात अशी मागणी

ईश्वरपुर: जेष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती असून त्यांचे अनेक प्रश्न गंभीर आहेत. आपण जेष्ठ नागरिकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा. जेष्ठ नागरिकांना हक्क मिळवून देणारे प्रलंबित विधेयक मंजूर होण्यासाठी आवाज उठवावा,असे साकडे आटपाडी येथील जेष्ठ नागरिकांनी माजी मंत्री आ.जयंत पाटील यांना राजारामनगर येथे भेटून घातले.

लोकनेते राजारामबापू पाटील व आटपाडी तालुक्यातील ऋणानुबंध वृद्धिंगत करण्यासाठी आ.जयंत पाटील यांनी आटपाडी तालुक्यात राजारामबापू समूहातील संस्थांच्या शाखा,शैक्षणिक संकुल सुरु करावे,अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली.

राजारामनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक, ज्येष्टांचे नेते अरविंद चांडवले,नंदकुमार राक्षे, सौ.गुलशन वंजारी,दत्तात्रय मोकाशी,पोपटराव उर्फ विठ्ठलराव देशमुख,सुनिल करडे आदी आ.पाटील यांना भेटले. त्यांनी आ.त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देत त्यांचा सन्मान केला.

सादिक खाटीक म्हणाले,ज्येष्ट नागरीकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा देण्याबाबतचे २०२५ चे विधेयक क्रमांक – ७२ हे प्रलंबित आहे. हे विधेयक तातडीने मंजूर होण्यासाठी आ.पाटील यांनी आवाज उठवावा,ही आमची भावना आहे. सर्व जाती-जमाती,धर्माच्या ६० वर्षावरील स्त्री-पुरुष नागरीकांना १० हजार रुपये पेन्शन मिळावी,ज्येष्टांच्या अडचणी सोडविणेसाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून या खात्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी,जेष्ठ नागरिकांना विविध सवलतींच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,ज्येष्टांचा सन्मान,त्यांची सुरक्षा,संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी विशेष आचारसंहिता करावी, ॲट्रॉसिटी कायद्यासारख्या संरक्षक कायदा करावा, बँकिंग सेवांमध्ये ज्येष्टांसाठी स्वतंत्र खिडकी,व मदतनीस द्यावा आदी आमच्या मागण्या आहेत. वेगवेगळ्या संघटना,त्यांचे पदाधिकारी सातत्याने आवाज उठवित आहेत,आंदोलनेही करीत आहेत. मात्र प्रश्न असून मार्गी लागलेले नाहीत.

लोकनेते राजारामबापू पाटील हे सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे प्रेसिडेंट असताना त्यांनी आटपाडी चे रुस्तुमरावबापू यांना उपाध्यक्ष पद देवून आटपाडीचा सन्मान केला होता. आ.जयंतराव पाटील यांनी साखर कारखाना,बँक,दूध संघाच्या शाखा,तसेच शैक्षणिक संकुल उभा करून आटपाडी तालुक्याशी असणारे ऋणानुबंध वृद्धिंगत करावेत,अशी मागणीही खाटीक यांनी केली केली.

आणखी वाचा

error: Content is protected !!