स्टार्टअपसाठी युवकांशी चर्चा करून आणखी चांगले धोरण तयार करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मंथन फॉर युवा २०२६’चा रेशीमबाग, नागपुरात उत्साहात समारोप

नागपूर : शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि स्टार्टअप यांसह विविध क्षेत्रांत युवा पिढीचा सकारात्मक सहभाग वाढत आहे. युवकांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देतानाच स्टार्टअप इकोसिस्टममध्ये युवकांशी चर्चा करून आणखी चांगले धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रेशीमबाग, नागपूर येथे आयोजित ‘मंथन फॉर युवा २०२६’ या उपक्रमाच्या समारोपप्रसंगी ते युवकांना संबोधित करत होते. या उपक्रमाला युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रातील आयकॉन व्यक्तींशी थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र व देशासाठी युवकांना शपथ तसेच ढोल-ताशा पथकाच्या जागतिक विक्रमासह विविध उपक्रम यावेळी घेण्यात आले.

सुप्रसिद्ध क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते दिलीप महादू गावित, अर्जुन देशपांडे आणि किरण शहाजी यांच्याशी संवाद साधला. या मान्यवरांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभव आणि संघर्षाची कहाणी युवकांसमोर मांडत त्यांना प्रेरणा दिली.

दरम्यान, महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा पथकाने या उपक्रमातून जागतिक विक्रमाची नोंद केली. ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ या तीन विक्रम नोंदणी संस्थांमध्ये या विक्रमाची नोंद झाली. आधार नोंद असलेल्या ५८५ ध्वजधारकांच्या सहभागातून हा विक्रम साकारण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विक्रम नोंदविणाऱ्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आजची युवा पिढी विविध क्षेत्रांत आपल्या कौशल्याच्या जोरावर नावलौकिक मिळवत आहे. संविधानामुळे देशातील लोकशाही प्रगल्भ झाली असून, त्याच लोकशाही व्यवस्थेमुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

युवकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे धोरण असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, स्टार्टअपसाठी इकोसिस्टम पॉलिसी तयार करण्यात आली आहे. या धोरणाच्या माध्यमातून युवकांना शंभर टक्के मदत करण्याचा उद्देश आहे. युवकांशी चर्चा करून या धोरणात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.

तसेच मुलांचा वाढता स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी विचारमंथन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. युवकांना स्क्रीनपासून मैदानाकडे वळविण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निश्चित धोरण तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘मंथन फॉर युवा २०२६’च्या माध्यमातून युवकांच्या कौशल्याला, क्रीडा क्षेत्रातील सहभागाला आणि नवउद्योजकतेला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या संख्येने युवक-युवतींच्या सहभागामुळे या उपक्रमाचा समारोप उत्साहात झाला.

आणखी वाचा

error: Content is protected !!