लोकशाही धोक्यात येते तेव्हा तरुणच पुढे येतात : विजय चोरमारे

डॉ. गेल ऑमव्हेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कासेगाव येथे आयोजित ‘झेन झी आंदोलन व लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर व्याख्यान

कासेगाव : ज्या-ज्या वेळी लोकशाही धोक्यात आली, त्या-त्या वेळी ती वाचविण्याचे काम तरुण पिढीने केले आहे. आपली लढाई कोणत्या नेत्याविरुद्ध नसून माणसामाणसांत आणि जातीजातींत द्वेष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. ही लढाई पुढेही सुरूच राहील, असे प्रतिपादन विजय चोरमारे यांनी केले.

डॉ. गेल ऑमव्हेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कासेगाव येथे आयोजित ‘झेन झी आंदोलन व लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

चोरमारे म्हणाले, झेन झी आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात कोणत्याही दूरचित्रवाहिनीवर या आंदोलनाच्या बातम्या दाखविल्या जात नव्हत्या. मात्र फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटरच्या माध्यमातून हे आंदोलन देशभर आणि जगभर पोहोचले. देशभर NSUI व युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलने झाली. आंदोलकांवर लाठीमार आणि पाण्याचे फवारे मारण्यात आले; मात्र त्याकडे अनेक टीव्ही चॅनेल्सनी दुर्लक्ष केले.

ते पुढे म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर १७ दिवसांनी त्याची दखल घेण्यास सुरुवात झाली. अभिजित दिपके आणि नेहा बोरा यांनीही त्यांना पाठिंबा देत उपोषण केले. २० जुलैच्या मोर्चाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचवेळी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसदेकडे निघालेल्या मोर्चात विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

झेन झी आंदोलनाने आपल्या पिढीला चपराक दिली आहे. २० जुलै हा स्वातंत्र्योत्तर इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही धोक्यात आली असताना तरुण पिढीने ती वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. या आंदोलनाने चळवळ करणाऱ्यांना अनेक धडे दिले आहेत. विचारधारेविना कोणतीही लढाई पुढे जाऊ शकत नाही, असे चोरमारे यांनी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी आणि खासदारांनी संसदेत आवाज उठविल्याने तसेच आंदोलकांचा दबाव वाढल्याने धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला, असा दावाही त्यांनी केला. अमित शहा संसदेत येऊ शकले नाहीत, त्याचे श्रेयही झेन झी आंदोलनाला असल्याचे चोरमारे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. भारत पाटणकर म्हणाले, सर्वच पिढ्या झेन झीप्रमाणे घडलेल्या नसतात; मात्र काही कालखंडानंतर अशा पिढ्या निर्माण होतात आणि त्या बदल घडवून आणतात. त्यामुळे झेन झी पिढीचे कौतुक केले पाहिजे. स्वातंत्र्याच्या चळवळीतील १९४२ची पिढी आणि सत्तरच्या दशकातील पिढीही अशाच स्वरूपाची होती. त्यांनी त्या-त्या काळातील अन्यायाला विरोध करून बदल घडवून आणला.

राहुल गांधी यांनी पुण्यातील सभेत मनुस्मृतीतील चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील उतरंडीची मांडणी करून ती मोडण्याबाबत केलेल्या विधानाचाही पाटणकर यांनी उल्लेख केला. काँग्रेसच्या इतिहासात असे विधान प्रथमच झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. दिलीप चव्हाण म्हणाले की, झेन झी आंदोलनाचे नेतृत्व परदेशात शिक्षण घेतलेल्या किंवा जेएनयूसारख्या विद्यापीठांत शिकलेल्या तरुणांनी केले आहे. देव-देवता आणि उच्च-नीचतेला महत्त्व देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेतून असे नेतृत्व निर्माण होऊ शकले नसते. तत्त्वज्ञान ही काहींची मक्तेदारी मानली जात होती; मात्र आता सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही तत्त्वज्ञान मांडू शकत आहेत. भारतात बुद्धिमान व्यक्तींना लहान-सहान गोष्टींत वेळ घालवावा लागणे ही दुर्दैवाची बाब आहे. भारतीय समाजाला पारतंत्र्याचे डोहाळे लागले आहेत, असे चित्र दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सुभाष माने, निवृत्ती झाडे, रासाठे, भारत पाटणकर आदींनी त्रिशरण व पंचशीलाने कार्यक्रमाची सुरुवात केली.

स्वागत व प्रास्ताविक कॉ. जयंत निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद पाटसुते यांनी केले, तर आभार अॅड. संदीप पाटील यांनी मानले. यावेळी प्रा. प्रशांत कदम, विनोद तोडकर, सोमनाथ वाघमारे, रवींद्र रणदिवे, संतोष गोटल, डी. के. बोडके, रामभाऊ माळी, हरिश्चंद्र दळवी, प्रकाश साळुंखे, प्रकाश भातुसे, नजीर चौगुले, जगन्नाथ कुडतुडकर, विद्या पाटील, ज्योती निकम, आनंदा सपकाळ, देवानंद कदम, शंकर पाटील यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!