सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांना गती द्या; पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे निर्देश

कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) आणि त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनच्या कामांना गती द्यावी. मंजूर प्रकल्पांची कामे व यांत्रिकीकरणाची कामे समांतरपणे सुरू ठेवावीत, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिले.

कोल्हापूर व इचलकरंजी परिसरातील प्रदूषित क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या सर्व सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराबाबत मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह नदी परिसरातील ग्रामपंचायती आणि औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगा नदीत जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा सविस्तर आढावा घेतला.

पर्यावरण रक्षण ही सामूहिक जबाबदारी

पर्यावरण रक्षणाची जबाबदारी केवळ पर्यावरण विभागाची नसून ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. भविष्यातील धोके नागरिकांनी ओळखून आतापासूनच जागरूक झाले पाहिजे.

पंकजा मुंडे
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री

कोल्हापूर व इचलकरंजीतील सर्व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच छोट्या गावांनी पर्यावरणपूरक आराखडा तयार करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या कामकाजाचा सांडपाणी प्रक्रिया आणि पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने लवकरच मुंबई येथे आढावा घेण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

गावांसाठी घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनाचा आराखडा

लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक गावासाठी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्यासाठी निधीची तरतूद करावी तसेच इचलकरंजी महापालिकेला जीएसटीमधील फरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी आमदार राहुल आवाडे यांनी केली.

जिल्हा परिषदेकडून सध्या ४१ कोटी रुपयांची कामे सुरू असून, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हा परिषदेला अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी केली.

या बैठकीत कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण, सांडपाणी व्यवस्थापन आणि सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

बैठकीस आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोक माने, महापौर रूपाराणी निकम, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह प्रदूषण नियंत्रण, एमआयडीसी, पशुसंवर्धन आणि अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जल अभियंता हर्षदीप घाडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी समीर वाघ्रांबरे आदींनी बैठकीत सहभाग घेतला.

आणखी वाचा

error: Content is protected !!