बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न ; यंदाच्या हंगामासाठी तोडणी-वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज
चिखली : अडचणीतून जात असलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या किमतीबरोबरच इथेनॉलच्या दरातही वाढ करून ते स्थिर ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणी विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केली. चिखली येथे विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ साठी बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून नाईक बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
मानसिंगराव नाईक म्हणाले, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या परिस्थितीतून जात असून, केंद्र सरकारच्या अनिश्चित धोरणाचा त्यावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात झालेली अचानक वाढ आणि त्यानंतरची घसरण यामुळेही उद्योगापुढील अडचणी वाढल्या आहेत. साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी साखरेबरोबरच इथेनॉलच्या दरात वाढ करून ते स्थिर ठेवण्याची आवश्यकता आहे.

गेल्या गळीत हंगामात कारखान्यासमोर विविध अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, आर्थिक शिस्त न बिघडू देता त्यावर मात करण्यात आली. यंदाच्या हंगामासाठी तोडणी-वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज असून, गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात येणार आहे. संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी कोंडिबा चौगुले व संचालक अनिता चौगुले यांच्या हस्ते विधिवत होम व पूजा करण्यात आली. अध्यक्ष मानसिंगराव नाईक व त्यांच्या पत्नी सुनीता नाईक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. संचालक शिवाजी पाटील यांनी स्वागत केले, तर कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक, संचालक विराज नाईक, विजयराव नलवडे, यशवंत निकम, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, सुरेश पाटील, संभाजी पाटील, बिरुदेव आंबरे, सुहास पाटील, यशवंत दळवी, संदीप तडाखे, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजय देशमुख, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. विश्वास पाटील यांनी आभार मानले.










