कृष्णा विश्व विद्यापीठात शिक्षक दिन उत्साहात साजरा; गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार
कराड : शिक्षकाची भूमिका केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित नाही; तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करून त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त केले पाहिजे. तसेच त्यांच्यात सामाजिक परिणामांची जाणीव निर्माण करावी. शिक्षकाने केवळ माहिती देणारा ‘शिक्षक’ न राहता ‘गुरु’ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कृष्णा विश्व विद्यापीठाचे सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. कृष्णा विश्व विद्यापीठात आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या संयोजनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी. आणि अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे उपस्थित होते.
डॉ. मिश्रा पुढे म्हणाले, की शिक्षक दिन हा केवळ औपचारिक उत्सव नसून, शिक्षकांनी स्वतःच्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला आणि प्रश्न विचारण्याच्या अधिकाराला शिक्षण व्यवस्थेत महत्त्व देण्याची गरज आहे. शिक्षणातून धैर्य, धैर्यातून दृढविश्वास आणि दृढविश्वासातून चारित्र्य निर्माण झाले तरच सक्षम राष्ट्रनिर्मिती शक्य आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी ज्ञान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्यनिर्मिती, व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवावी, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी आपल्या भाषणात शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की शिक्षकांकडून केवळ विषयाचे ज्ञानच नव्हे, तर संयम, शिस्त, समस्यांवर मात करण्याची क्षमता आणि अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती शिकायला मिळते. सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कौशल्य प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक साधनांचा वापर वाढला असला तरी शिक्षकाचे मार्गदर्शन आणि मानवी सहकार्य यांची जागा कोणतीही यंत्रे घेऊ शकत नाहीत.
या सोहळ्यात विद्यापीठातील गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. नवनाथ जाधव, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाच्या उपसंचालिका अर्चना कौलगेकर, डॉ. डी. के. अगरवाल यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










