कराड : कराड तालुक्यातील मौजे तळबीड येथे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक पाहणी केली. यावेळी त्यांनी डिजिटल प्रणालीद्वारे पीक पाहणी कशी करावी, तसेच पिकांची नोंदणी करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक घेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्रशासनाकडून पीक पाहणी मोहिमेची अंमलबजावणी अचूक आणि गतिमान पद्धतीने व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः शेतात उतरून या प्रक्रियेची माहिती घेतली. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद करताना आवश्यक माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंद शासकीय अभिलेखात करणे सुलभ होणार आहे. भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, तसेच विविध शासकीय योजना व मदतीचा लाभ मिळविताना पीक नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.
या पाहणीवेळी कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.










