व्हीएसआयचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू पाटील यांचे गौरवोद्गार
कुंडल : साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधील दरी वाढत असताना, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांशी असलेले ऋणानुबंध घट्टपणे जपले आहेत, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक डॉ. संभाजीराव कडू पाटील यांनी केले.
क्रांती कारखान्याच्या सन २०२६-२७ गाळप हंगामाच्या प्रारंभानिमित्त पूजा, बॉयलर अग्नीप्रदीपन तसेच सन २०२५-२६ मध्ये एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कडू पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा आमदार अरुण लाड होते.
सध्या अनेक साखर कारखान्यांचे गाळपासाठी ऊस मिळवणे हेच एकमेव ध्येय झालेले दिसते. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी फार कमी कारखाने प्रयत्नशील आहेत. या कामामध्ये क्रांतिअग्रणी कारखाना अग्रस्थानी आहे. शेतकरी आणि कारखाना यांनी एकमेकांची काळजी घेत, परस्पर विश्वासाचे नाते जपत प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे.
डॉ. संभाजीराव कडू पाटील
महासंचालक – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि मार्गदर्शन देण्याची क्रांती कारखान्याची भूमिका कौतुकास्पद आहे. कारखाना आणि शेतकरी यांच्यातील नाते केवळ ऊस खरेदी-विक्रीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक व कृषी विकासाशी जोडले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इफ्को, पुणेचे राज्य विपणन व्यवस्थापक डॉ. महादेव पवार यांनी ऊस शेतीतील रासायनिक खतांवरील वाढता खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांनी संतुलित खत व्यवस्थापनावर भर देण्याचे आवाहन केले. योग्य प्रमाणात आणि गरजेनुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता टिकवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सन २०२५-२६ गाळप हंगामात एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. अर्जुन पवार, संभाजी पाटील, अशोक होनमाने, नामदेव जाधव, अर्जुन कदम, बाळकृष्ण धोत्रे, दिलीप जाधव, शिवाजी लाड, दशरथ लाड, ऋषिकेश पाटील आणि जयंतराव यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पवार, राजेंद्र भोईटे, माजी जि. प. सदस्य नितीन नवले, माजी व्हा. चेअरमन पोपटराव संकपाळ, माजी संचालक जवाहर पाटील यांच्यासह संचालक, माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत हर्षल पाटील यांनी केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे यांनी केले. आभार दिलीप पार्लेकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन विलास जाधव यांनी केले.










