आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी; निधी देण्याची मंत्री प्रकाश आबिटकरांची ग्वाही
कराड : कराड शहरासह तालुका तसेच लगतच्या ग्रामीण व डोंगरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र असलेल्या स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करण्यासाठी शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली.
याबाबत त्यांनी आज मुंबई येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी कराड उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली.
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयाची मुख्य इमारत तसेच आवारातील इतर इमारती जुन्या झाल्याने मोठ्या प्रमाणात झीज व पडझड झाली आहे. इमारतीच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात गळती होत असून, भिंतींना तडे गेले आहेत. तसेच जुने विद्युत व प्लंबिंगचे जाळे आणि स्वच्छतागृहांची दुरवस्था यामुळे रुग्णांसह डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तातडीने दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, सिव्हिल व इलेक्ट्रिकल नूतनीकरणाची कामे करणे आवश्यक आहे. या सर्व कामांसाठी शासनाने ४.५० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आ. डॉ. भोसले यांनी केली. रुग्णालयाची सुरक्षितता आणि आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी या कामांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
कराड येथील स्व. सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयावर कराड शहरासह ग्रामीण आणि डोंगरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी निधी मिळावा, याबाबत आरोग्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच हा प्रश्न मार्गी लागून रुग्णांना अधिक सुरक्षित व चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
आमदार डॉ. अतुलबाबा भोसले










