शाळा सर्वोत्तम करण्यासाठी सांघिकपणे प्रयत्न करा : आ. जयंत पाटील

कासेगाव शिक्षण संस्थेचा शिक्षक-शिक्षकेत्तर स्नेहमेळावा संपन्न

ईश्वरपूर : शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेला सामोरे जाताना सर्वांनी सांघिकपणे प्रयत्न करून आपली शाळा सर्वोत्तम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. सध्या खोटा इतिहास सांगून युवा पिढीची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे युवा पिढीसमोर खरा इतिहास मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

कासेगाव येथील पदयात्री स्मारकात कासेगाव शिक्षण संस्था आणि कासेगाव शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. पाटील बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. माने, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव आर. एस. जाखले, कार्यकारिणी सदस्य सुभाषराव आडके, संजीव पाटील, प्रशासकीय समन्वयक भरत सरनोबत, पतसंस्थेचे अध्यक्ष एच. एस. पाटील, उपाध्यक्ष एन. डी. पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी शिक्षणतज्ज्ञ व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, लोकनेते राजारामबापू पाटील आणि कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

आ. पाटील म्हणाले, समाजमाध्यमे हे शिक्षण क्षेत्रासमोरील एक मोठे आव्हान आहे. मुलांना समाजमाध्यमांच्या माध्यमातून आपल्यापेक्षा अधिक माहिती मिळत आहे. मात्र, त्यामध्ये खऱ्यापेक्षा खोटे आणि चांगल्यापेक्षा वाईट माहिती अधिक असण्याची शक्यता आहे. समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या मुलांची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन भ्रमणध्वनीचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान तसेच लेखन-वाचन कौशल्यावर विशेष भर द्यावा. अनेकदा मुले उत्तीर्ण होत जातात; मात्र त्यांना व्यवस्थित लिहिता-वाचता येत नसेल, तर त्यांच्या भविष्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. शिक्षकांनी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनांची संस्थेकडून निश्चितपणे दखल घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्य आर. डी. सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव शिक्षण संस्था दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय समन्वयक भरत सरनोबत यांनी मार्गदर्शन केले. कासेगाव शिक्षण संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता कायम ठेवून प्रत्येकाने संस्थेसाठी सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिक्षक आर. एस. पांढरबळे, स्मिता कोठावळे यांनी मनोगत व्यक्त केले. एच. एस. पाटील, सुवर्णा जाधव, मच्छिंद्रनाथ लोहार व प्रा. रमेश पाटील यांनी विविध सूचना मांडल्या.

पतसंस्थेचे अध्यक्ष एच. एस. पाटील यांनी आभार मानले. प्रा. लता एवळे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी विश्वनाथ जाधव, शिवाजी साळुंखे-पाटील, रंगराव मलगुंडे, प्रा. कृष्णा मंडले, ए. डी. पाटील यांच्यासह संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!