‘एक दिवस शिक्षक’ बनत विद्यार्थ्यांनी अनुभवली अध्यापनाची जबाबदारी

नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

पेठ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पेठ येथे शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांना ‘एक दिवस शिक्षकांसोबत’ या अभिनव उपक्रमातून प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमास श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुलदादा महाडिक उपस्थित होते. त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. राहुल चिटणीस, फिजिओथेरपी विभागाचे सहसंचालक दत्तात्रय गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील अणेकर, एमबीए विभागाचे संचालक डॉ. संतोष वाडकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक स्वरूप, महालक्ष्मी आयटीआयचे प्राचार्य प्रा. आदर्श पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. निलेश साने, प्रवेश प्रक्रिया प्रमुख सत्यजित घोरपडे, विद्यार्थी असोसिएशनचे प्रमुख प्रा. आशिष पारेख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, शिक्षक केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असतात, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी ‘एक दिवस शिक्षकांसोबत’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम घेण्यात आला. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारत वर्गात प्रत्यक्ष अध्यापन केले. विषयाची तयारी, आत्मविश्वासाने मांडणी, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन, वेळेचे नियोजन, वर्गातील शिस्त आणि प्रभावी संवाद यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, सादरीकरण व अध्यापन कौशल्य विकसित होण्यास मदत झाली. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहणे अपेक्षेपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले. शिक्षकांची मेहनत, जबाबदारी, संयम, विषयाची तयारी आणि प्रभावी संवादाचे महत्त्व या उपक्रमातून नव्याने जाणवल्याचेही विद्यार्थ्यांनी नमूद केले.

पारंपरिक पद्धतीने शिक्षक दिन साजरा न करता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव देऊन शिक्षक दिनाचे महत्त्व अनुभवातून समजावून देण्याचा महाविद्यालयाचा उपक्रम विशेष ठरला. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक दृढ होण्यासही मदत झाली.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी व प्राचार्य डॉ. सुनील अणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. अमोल पाटील, प्रा. आशिष पारेख, प्रा. चंद्रकांत गावडे यांनी आयोजनासाठी विशेष योगदान दिले. सर्व विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

‘शिक्षक घडवतो विद्यार्थी आणि विद्यार्थी घडवतो उद्याचा समाज’ या विचाराची प्रचिती देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आणखी वाचा

error: Content is protected !!