क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन सेवांवर भर देण्याचे आवाहन
मुंबई : भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या यशोगाथेचा पुढील अध्याय फिनटेक क्षेत्रातील नव्या पिढीच्या नवोन्मेषावर आधारित असेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
मुंबईतील बीकेसी येथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फिनटेक क्षेत्रातील तरुणाईची ऊर्जा, नवकल्पना, जोखीम घेण्याची क्षमता आणि मोठी स्वप्ने विकसित भारताच्या भविष्याविषयीचा विश्वास अधिक दृढ करतात, असे मोदी यांनी सांगितले.

जागतिक पातळीवर संघर्ष आणि अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारताने ७.८ टक्के आर्थिक विकास नोंदविला आहे. त्यामुळे जगाला भारताच्या विकास क्षमतेचा नवा विश्वास मिळाला असून, भारताच्या व्यापक आर्थिक स्थैर्याला आणि संरचनात्मक सुधारणांना मिळणारी जागतिक मान्यता याचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताच्या फिनटेक यशोगाथेचा सर्वात मोठा आधारस्तंभ यूपीआय असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, २५ ऑगस्ट रोजी यूपीआयने दहा वर्षे पूर्ण केली. दहा वर्षांपूर्वी बँकिंग सेवा सर्वसामान्यांच्या बोटांवर उपलब्ध होतील, ही संकल्पना अनेकांना अशक्य वाटत होती. मात्र, आज बँकिंग व्यवस्थेपासून दूर असलेले कोट्यवधी नागरिक फिनटेक विकासाचे प्रमुख भागीदार बनले आहेत.
ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे २,४०० कोटींहून अधिक व्यवहार झाले. यूपीआय आता भारतापुरते मर्यादित न राहता ११ देशांमध्ये उपलब्ध झाले आहे. सिंगापूरसोबत पेमेंट प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले असून, पुढील टप्प्यात भारताने इतर देशांच्या पेमेंट प्रणालींशीही जोडणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन मोदी यांनी केले.
पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून लाखो पथविक्रेत्यांना औपचारिक वित्तीय व्यवस्थेशी जोडण्यात यूपीआयची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. स्वनिधी लाभार्थ्यांच्या सरासरी वार्षिक उत्पन्नात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, या योजनेमुळे त्यांच्या निवास, पोषण, आरोग्यसेवा आणि मुलांच्या शिक्षणाच्या संधींमध्येही सुधारणा झाल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. या योजनेला २०३० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, ग्लोबल फिनटेक फेस्टचे अध्यक्ष क्रिस गोपालकृष्णन यांच्यासह देश-विदेशातील फिनटेक क्षेत्रातील नवोन्मेषक, उद्योजक, गुंतवणूकदार आणि मान्यवर उपस्थित होते.










