केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान ; प्रतिक पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार
ईश्वरपूर : गेल्या ५६ वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेतकरी, शेतमजूर आणि समाजातील सामान्य घटकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा ‘अवॉर्ड फॉर को-ऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन हाय रिकव्हरी एरिया’ हा राष्ट्रीय पुरस्कार कारखान्यास प्रदान करण्यात आला.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या शानदार सोहळ्यात कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, संचालक अतुल पाटील आणि मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह देशभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
देशातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाकडून दरवर्षी विविध निकषांवर कारखान्यांचे मूल्यांकन करून राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. केंद्र सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजारामबापू सहकारी साखर कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड केली.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी शेतकरी, शेतमजूर, सामान्य नागरिक तसेच उपेक्षित व वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या प्रगतीसाठी कार्य केले. त्याच सामाजिक बांधिलकीचा विचार पुढे नेत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने शेतकरी व सामान्य माणसाच्या हितासाठी विविध योजना व उपक्रम राबविले. या कार्याची दखल घेत कारखान्यास राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
शेतकरी, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे यश
अध्यक्ष प्रतिक पाटील म्हणाले, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास आतापर्यंत राज्यातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा ‘सामाजिक उत्तरदायित्व’ हा राष्ट्रीय पुरस्कार कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा आहे.
ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा विश्वास, संचालक मंडळाची साथ तसेच अधिकारी व कामगारांच्या योगदानातून हा यशाचा टप्पा गाठता आला. भविष्यातही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ही वाटचाल अखंड सुरू राहील असेही प्रतिक पाटील यांनी सांगितले.










