राजारामबापू कारखाना उभारणार बायोगॅस प्रकल्प : आ. जयंत पाटील

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

ईश्वरपूर : साखर उद्योगातील प्रेसमडपासून गॅस निर्मिती करणाऱ्या बायोगॅस प्रकल्पांना चांगले भवितव्य आहे. या प्रकल्पांना शासनाकडून अनुदान मिळत असून उत्पादित गॅसलाही चांगला दर मिळत आहे. त्यामुळे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना निश्चितपणे बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारेल, असा विश्वास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, उरुण-ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे, कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील व प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे उपस्थित होते.

दिल्ली येथे कारखान्याला प्राप्त झालेल्या राष्ट्रीय ‘सामाजिक उत्तरदायित्व’ पुरस्काराबद्दल अध्यक्ष प्रतिक पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आ. जयंत पाटील पुढे म्हणाले, ७ हॉर्सपॉवरपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीजबिल शासनाने माफ केले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांचेही वीजबिल माफ करावे, यासाठी आम्ही न्यायालयात गेलो आहोत. एफआरपीचा कायदा झाला; मात्र या कायद्यामुळे साखर कारखान्यांमधील ऊसदराची स्पर्धा संपली आहे. कालानुरूप या कायद्यात बदल होणे आवश्यक आहे. शासनाने साखरेच्या विक्री दरात वाढ करावी, अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

देशात गरजेइतकी साखर उपलब्ध नसल्याने आगामी काळात, विशेषतः दिवाळीत साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

राजारामबापू कारखान्यास नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांना साखर, विमा आणि आरोग्य सुविधा देण्याचा अध्यक्ष प्रतिक पाटील यांचा प्रयत्न आहे. या सुविधांचा तपशील येत्या काही दिवसांत शेती विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील ऊस बाहेर जाऊ नये, यासाठी पाणीपुरवठा संस्थांनी काळजी घ्यावी. ऊसतोड व वाहतुकीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रकार तातडीने बंद करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवे उपक्रम

अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी भाषणात सन २०२५-२६ मधील ऊस गाळप, साखर विक्री, कारखान्याची आर्थिक स्थिती आणि सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कारखान्यास सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आम्ही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सभासदांना कुसुमताई स्मार्ट हेल्थ कार्ड, टप्प्याटप्प्याने विमा योजना आणि साखर यांसह विविध सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या योजनांचा सविस्तर तपशील लवकरच शेती विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

पी. आर. पाटील व रघुनाथदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शंकरराव मोहिते, रवींद्र पिसाळ, लक्ष्मण पाटील व बाजीराव पाटील यांनी विविध सूचना मांडल्या. सभेत सर्व विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

यावेळी विविध संस्था व कारखान्याचे आजी-माजी संचालक, सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे यांनी सभा नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सचिव डी. एम. पाटील यांनी श्रद्धांजली ठराव मांडून मागील इतिवृत्ताचे वाचन केले. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

आणखी वाचा

error: Content is protected !!