ईश्वरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोळेकर कुटुंबाचा जाहीर प्रवेश

आ. जयंत पाटील यांनी केले स्वागत

ईश्वरपूर : माजी नगरसेवक स्व. विजयसिंह कोळेकर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका श्रीमती शालन कोळेकर आणि त्यांचे चिरंजीव अक्षय कोळेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पुष्पहार घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

कोळेकर माता-पुत्राच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या कामाला अधिक बळ मिळेल, अशी भावना आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, स्व. विजयसिंह कोळेकर हे स्व. विजयभाऊ पाटील यांचे जिवाभावाचे सहकारी होते. त्यांनी पक्ष संघटनेत तसेच नगरपालिकेत प्रभावी काम केले. मध्यंतरी शालन कोळेकर व अक्षय कोळेकर पक्षापासून बाजूला गेले होते. आता त्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला असून त्यांचा योग्य सन्मान ठेवला जाईल.

लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, स्व. विजयसिंह कोळेकर यांनी पक्षाचा कार्यकर्ता आणि नगरसेवक म्हणून प्रभावी काम केले. शालन कोळेकर व अक्षय कोळेकर हे आ. जयंतराव पाटील आणि पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार असून आ. जयंतराव पाटील हे कुटुंबप्रमुख असल्याचे सांगत पक्षात सर्वांना सन्मान आणि संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले.

अक्षय कोळेकर म्हणाले, आम्ही आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योगदान देऊ.

यावेळी उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, गटनेत्या अरुणादेवी पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवानराव पाटील, सुभाषराव सूर्यवंशी, मुनीर पटवेकर, बांधकाम सभापती संदीप माने, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळेकर, माजी जि.प. सदस्य संभाजी कचरे, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी शहराध्यक्षा रोझा किणीकर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!