मराठवाड्यातील कविंनी जिंकली पश्चिम महाराष्ट्रातील रसिकांची मने
विटा : दुष्काळामुळे उध्वस्त होणारी शेती आणि शेतकऱ्यांचे वेदनादायी जीवन, दिल्लीतील जंतर-मंतरवरील तरुणाईचे आंदोलन, स्त्री-पुरुष समानता, निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि दुष्काळ अशा विविध विषयांवरील कवितांनी विट्यातील कविसंमेलन रंगले. मराठवाड्यातून आलेल्या कविंनी आपल्या संवेदनशील आणि वास्तववादी कवितांनी पश्चिम महाराष्ट्रातील रसिकांची मने जिंकली.
क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठात क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त निमंत्रित कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कवी व विडंबनकार प्रभाकर साळेगावकर (माजलगाव) यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले.
अध्यक्षीय भाषणात प्रभाकर साळेगावकर म्हणाले, “कवितेतून जगण्याची प्रेरणा मिळते. आत्महत्येला पर्याय कविता असते. वेदनेतून कवितेची निर्मिती होते. कवी काळाच्या एक पाऊल पुढे टाकत असतो.” क्रांतिसिंह नाना पाटील खासदार असताना १९६९ मध्ये त्यांनी मराठवाड्यात रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. यावेळी साळेगावकर यांनी ‘कोकणचा राजा आंबा पिकतो’ या गाण्याचे विडंबन सादर केले. त्याला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
प्रारंभी शाहीर काकासाहेब देशमुख यांनी ‘माय’ कविता सादर करून आईच्या आठवणी जागवल्या. समितीनी पाटील यांनी ‘जेन झी’ या कवितेतून आजच्या तरुणाईच्या मनातील अस्वस्थता आणि अपेक्षा मांडल्या. त्यांच्या कवितेला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दीपक पवार यांनी ‘कापूस’ आणि ‘दुष्काळ’ या कवितांमधून शेतकरी आणि शेतीचे विदारक वास्तव मांडले. कापूस कवितेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या, तर ‘दुष्काळ’ कवितेत दुष्काळाच्या प्रश्नाकडे समाजाचे बदलते दुर्लक्ष अधोरेखित केले.
व्ही. एन. देशमुख (‘घर’), अनिल पाटील (‘जगण्याची धडपड’), गणेश झेंडे, प्रा. हेमांगिनी माने (‘चिमणा-चिमणी’), राम सुतार (‘वाघ हसे हारणीला’), विमल जाधव (‘काय मागू मी’), राम मिरेकर, दीपाली घाडगे (‘जाऊ दे झालं’), सुनील गुरव (‘एक तरी झाड लाव’), दीपाली जाधव (‘पॉलिसी’), तुकाराम पवार (‘आई’), चंद्रकांत वेल्हाळ (‘ज्ञानाचे भांडार’), वृषाली कुलकर्णी, अशोक पवार (‘हेडमास्तर’), शिराज शिकलगार, सिमांयती पाटील (‘जेन-झी’), विश्वनाथ गायकवाड (‘प्रभात राणी’), रघुराज मेटकरी (‘मी कविता लिहावी कुणासाठी’) आणि अॅड. सुभाष पाटील (‘शंभू’) यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या.
मानवी रावताळे यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार महिंद यांनी स्वागत केले, तर अॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठाचे अध्यक्ष सुभाष पवार, प्रा. विलास पाटील, संजय मोरे (हणमंतवडिये), अरुण लंगोटे, देवकुमार दुपटे, इंद्रजीत पाटील, दत्तात्रय सपकाळ, सागर पाटील, पद्माकर यादव, दमयंती पाटील, गणेश झेंडे, शिराज शिकलगार यांच्यासह साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेसाहेब कदम यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.










