पाच हजारांची पहिली उचल मिळेपर्यंत ऊसतोड बंद

स्वाभिमानीचे आंदोलन; एन. डी. शुगरची ऊसतोड आणि वाहतूकही रोखली ; वाळव्यात ऊस आंदोलनाची धग कायम

ईश्वरपूर : चालू गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलनाची दुसऱ्या दिवशीही धग कायम राहिली. ऊस उत्पादकांना प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद पाडत ऊस वाहतूकही रोखली.

वाटेगाव, भाटवडे, शेणे तसेच वाघवाडी फाटा परिसरातील ऊसाच्या फडांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांनी एन. डी. शुगर व शकुंतलानगरकडे जाणाऱ्या ऊसाची तोड बंद पाडली. तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने थांबवून जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव, प्रवक्ते ए. यू. संन्दे, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, प्रदीप पाटील, पंडित सपकाळ, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, तानाजी साठे, राम पाटील, शिवलिंग शेटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेने यापूर्वीच एन. डी. शुगर प्रशासनाला ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत गळीत हंगाम सुरू करू नये, अशी सूचना केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने गेल्या आठ दिवसांपासून संघटनेच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून गळीत हंगाम सुरू ठेवल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी संघटनेने केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला.

गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच वाळवा तालुक्यात ऊस दरावरून आंदोलन सुरू झाल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधील दराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान, मंगळवारी वाघवाडी परिसरात सुमारे पाच ते सहा ट्रॅक्टरमधून होणारी भरलेल्या उसाची वाहतूक रोखण्यात आली होती.

पहिली उचल निश्चित होईपर्यंत उसाची कांडी देणार नाही

शेतकऱ्यांनो, जरा दम धरा. यावर्षी उसाचे क्षेत्र कमी आहे. तुमच्या उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. साखरेची विक्री पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे होत असताना सामान्य जनतेला साखर ६० ते ६५ रुपये किलोने मिळत आहे. तरीही साखर कारखानदार ऊस दराबाबत बोलत नाहीत. कारखानदार मात्र खुशाल ऊस वाहतूक करत आहेत. ऊसाची पहिली उचल निश्चित होईपर्यंत उसाची कांडी देणार नाही.

भागवत जाधव
नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

आणखी वाचा

error: Content is protected !!